चाकोरी
Marathi language _ मराठी भाषा
आज माझ्या स्कूटरखाली पिटुकली खारुताई चेंगरून ठार झाली . ... भेदरलेली खार सडक पार न करता माझ्याच चाकोरीने पळायला लागली . ती चाकोरी सोडेल , असा माझा अंदाज होता _ म्हणून मी हॅन्डल न वळवता सरळच चालवत होतो . कदाचित मी वळतानाच ती पण वळेल , अशी पण भीती !
प्रथम माझ्या डोक्यात ती खार सडक पार करेलच _ असे का यावे ?
' सडक मानवासाठी आहे , खारीसारख्या क्षुद्र जीवाला त्याची काय आवश्यकता ?' , अशी सुप्त अहंकारी स्वामित्वाची जाणीव आधी झाली .
नंतर भूतदया जागृत झाली ... चक्रव्यूहात फसल्यानंतर , जेथे मला ' जर - तर ' शी तडजोड करावी लागली . परंतू ती अयशस्वी ..
आणि ह्या शोकगर्भ क्षणिकेचा अखेर झाला खारीच्या मृत्यूत !
माझ्या वरचढपणाचा पराक्रम मी त्या दुबळ्या जीवावर असा गाजवला ( ? ). मी वेळीच थांबून व खारीची दिशा ओळखून वाहन चालवू शकलो असतो . मग हा निर्णय मला त्वरित का घेता आला नाही ? माझी एकांगी निर्णयशक्ती एका जीवाच्या हकनाक बळीला कारणीभूत ठरली .
माझ्या चाकोरीत शिरण्याची तिची चूक की मी माझं चाकोरी न सोडता चालणे ; ह्यात माझी चूक ?
_ पश्चातापाची शिक्षा तर मला झालीच आहे......९६
लेखक : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment