Saturday, October 29, 2022

बगळ्यांची फुले

बगळ्यांची फुले
Marathi language _ मराठी भाषा

तुझ्या उष्ण श्वासाचे तरंग हेलकावित असते मला
कवटाळतो मजला स्निग्ध बाहुपाशाचा रेशमी झूला ।

आभाळाच्या ओल्याचिंब मिठीत हिरवळली दग्ध भूमी
अलौकिक अनुभूती पल्याड सखे अद्वय तू अन् मी ।

तुझ्या अनघ हृदयातून प्रीतिसुधा अविरत वाहते
माझ्या स्वप्नाचे क्षितिज हे तुझ्या डोळ्यात विस्तारत जाते ।

ह्याच डोळ्यातील स्वप्नाने भातुकलीलाच जीवन केले
मनाच्या मिलनाने जन्मोजन्मीचे वचन दिले - घेतले ।

फिरुनी भातुकली , तीच पावसाळी वेडी कागदी होडी
चिमुकल्या मुठीतील जिक्कन जीवनास देतसे गोडी ।

असेच ओलेचिंब दिवस , ओल्या वाळूत घर बांधणे
इवल्या इवल्या नखांवर ही बगळ्यांची फुले मागणे ।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर ( ०२ )

No comments:

Post a Comment