वाट
Marathi language _ मराठी भाषा
स्थिर वाटेलाही प्रचंड असतो वेग
फक्त वाटसरूच्या पायी हवा आवेग ।
दृष्टीपथात काही टप्पे ही तरळते
अचानक पायवाट बाजूला वळते ।
हरवलेल्या टप्प्याची मनी हुरहुर
आटलेल्या यमुनेला कसा यावा पूर ।
वाटेत येणारे काही थांबे अकल्पित
संकल्पनेत ही कधी हार कधी जीत ।
गवसलेल्या मरूद्यानाची हिरवळ
दिशाहीन वारू वाटेला का हळहळ ।
वावटळीत उडालेला उद्देश पत्ता
वाटेवर आकाशाची निरंकुश सत्ता ।
कधी निवडुंग कधी फुलांचा ताटवा
भुलवित असतो आकांक्षेचा चकवा ।
पायाखालच्या वाटेला ना आदि ना अंत
वाटसरुची वाटचाल ही मात्र सान्त ।
दिशाहीन हेतूला क्रमणाचीच दिशा
सुरुवात सकाळी परंतु अंती निशा ।
भरगच्च स्वप्ने पण रिकामे ललाट
अगतिकपणे शून्याकडे जाते वाट ।
रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment