परंपरा
Marathi language _ मराठी भाषा
दूरवर पसरले ओसाड माळरान
मध्ये विद्रुप आणि उदास खडीची खाण ।
अकाली पावसाचे आत साचलेले पाणी
कदाचित उद्ध्वस्ततेची साश्रू ही कहाणी ।
खडीभरड यंत्राचे भग्नावशेष नक्षी
कधीकाळी नांदलेल्या जीवनाची ही एक साक्षी ।
राष्ट्रीय हमरस्त्याची किनार गर्द काळी
उकरलेल्या अंगणातली जशी रांगोळी ।
सुकलेली झुडपे , करपलेली धरती
एखादीच हिरवीकंच बाभूळ परकी ।
रिक्त धरणीची कूस , मी व्याकूळ अभियंता
खेकड्याच्या पिल्लावळीत मी पण करंटा ।
तरीही वसंतात लेवून लालजर्द तुरा
निष्पर्ण पळस सांभाळतो आहे परंपरा ।
रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment