Tuesday, July 26, 2022

अंधाराचा पांडू भासा. varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

अंधाराचा पांडू भासा
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

झाला उताना उबडा
उठला गा कसाबसा
इज्जतीचा भाजीपाला
अंधाराचा पांडू भासा ।१।

तोला तोलानच चाल्ला
पन करमाचा फासा
तंगडून चीतपट
अंधाराचा पांडू भासा ।२।

लावे निस्यानी बोटाले
जसा सिकारीचा ससा
हातपाय गराटले
अंधाराचा पांडू भासा ।३।

पत्ता नायी उजिडाचा
घरीदारी अवदसा
इलेक्सनचा बजार
अंधाराचा पांडू भासा ।४।

नेत्यायले भस्म्या रोग
रोज खाये भसाभसा
इथं आंगाचं चिपाड
अंधाराचा पांडू भासा ।५।

पोट्टे बायको कावते
कुठं बी जाऊन धसा
जागा नायीच लपाले
अंधाराचा पांडू भासा ।६।

दिवा टांगला सूर्व्याचा 
ढग झाला येडापिसा
फुका तंतर मंतर
अंधाराचा पांडू भासा ।७।

कुईजल्या उजिडाले
धक्का लागला जरासा
झाल्या चान्न्या फानोफान
अंधाराचा पांडू भासा ।८।

कोनाड्यात दिवनाल
उजिडते येक पसा
खेटे येता जाता वारा
अंधाराचा पांडू भासा ।९।

सटवाईची लेखन
भाग लिवते गा कसा
कसी पूंजली पाचवी
अंधाराचा पांडू भासा ।१०।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

1 comment: