गारगोटी
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली
वाडा खसून वायला
सयील झाल्या मुठी
बाप्पू अटकली खुटी
आता जासीनच कुठी ।१।
तुले येवढं खंदून
सापडली काय लोटी
तांदरीच्या नादानं भौ
फालतूची आटाआटी ।२।
गहू पेरला तावानं
उपडून तू पराटी
अकलीच्या कांद्यावानी
गोस्टं तुही उरफाटी ।३।
खाल्लं रिकामं बसून
झाल्या इकून इस्टेटी
इंधनकाडी सरली
आता जारतं तुराटी ।४।
याले त्याले खेटून तू
जातं म्याहाडाच्या वाटी
बह्याडाचीच भरती
लावे धुऱ्याले बी काटी ।५।
डोकस्यावर त बाप्पू
करमाची सेनपाटी
सांड्यावानी डखरून
करतं मुजोरी मोठी ।६।
गेला जमाना गंगनी
तुही कोरी हाये पाटी
हिऱ्याच्या खदानीतला
जसा निरा गारगोटी ।७।
गेल्या मयाली वाकून
तुही रग्गेली बी खोटी
गेले तसमे फाकून
लाज दाठ्ठ्याले गा मोठी ।८।
रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment