Tuesday, June 14, 2022

इंद्रधनुष्य ( मराठी कविता ). Marathi language _ मराठी भाषा

इंद्रधनुष्य
Marathi language _ मराठी भाषा

लुप्त वैशाख वणवा
सुप्त ढग पाझरले
मृद्गंध परिमळ
तनामनात झरले ।१।

मृगसरीच्या स्पर्शास
मृग नाहक झुरले
कस्तुरीच्या सुगंधास
काळ्या मातीत पुरले ।२।

साद आर्त पाखरांची
नाद तृषार्त विरले
चिंब शीळ रानीवनी
देहभान विसरले ।३।

निळे सावळे आभाळ
मेघ काळे उतरले
कनवाळू पावसाच्या
जग मायेत तरले ।४।

नवसृजन सोहळा
उद्भव अवतरले
जळबिंदूच्या कपाळी
इंद्रधनुष्य उरले ।५।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

No comments:

Post a Comment