Monday, May 23, 2022

कास्तकार राज्या. varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

कास्तकार राज्या
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

पुस्तकात वाचलं मी
कास्तकार राज्या हाये
दलिंदरी जलमाची
वावरात आजा हाये ।१।

खरं लिवल्यासारकं
असन त मज्या हाये
क लिवनीवाल्याच्या ह्या
खोट्याच गमज्या हाये ।२।

फासी घिवून मरते
असा कसा राज्या हाये
वाघं खाते मह्यन्याले 
असी काहून सज्या हाये ।३।

पिके कापूस खंडीनं
करजाचा बोज्या हाये
नेसू धोतर डांडाचं
कायच्यानं राज्या हाये ।४।

किती गा छाकटेगिरी
लिवतानी लाजा हाये
चिवत्याच बनवता
तुमालेच भेज्या हाये ।५।

किड्या मुंगीचं जगनं
उघडा दरुजा हाये
कोठी दिसली तिजोरी
करांडल्या बाजा हाये ।६।

ताम्ब गोचिडावानी
तुमची त मज्या हाये
पेता रगत दाबून
आमच्यात बेज्या हाये ।७।

नेते झाले राज्यावानी
बेपाऱ्याची मज्या हाये
कास्तकाराच्या नावानं
खोटा गाज्यावाज्या हाये ।८।

इस रुप्याची बाटल
पान्याची समजा हाये
गहू बी तेवढ्यालेच
हिसोबात वजा हाये ।९।

किती जुलूम करान
वर देव राज्या हाये
घडे भरले पापाचे
इतिहास ताजा हाये ।१०।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

No comments:

Post a Comment