स्त्री मुक्ती की स्त्री विकास ?
Marathi language _ मराठी भाषा
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: ।
( स्त्री मुक्ती ह्या विषयावर आलेल्या लेखावरील माझी प्रतिक्रिया . इ.स. १९९६ )
स्त्री मुक्ती म्हणजे काय ? _ आपण ग्रामीण स्त्रियांवर जुन्या विचारांच्या गर्तेत पडल्याचा जो निष्कर्ष काढता , त्यातील जुने विचार म्हणजे काय ? _ पतीशी , पतीच्या व्यक्तिमत्वाशी वा पतीच्या घराशी एकरूप होणे ; पती व पतीचं घर सर्वस्वी आपलं मानून त्या घराशी राब - राब राबणे ; प्रसंगी गैरसमजुती मुळे , स्वभावामुळे , संतापामुळे शारीरिक वा मानसिक त्रास - त्राण सहन करणे ; पितृसत्ताक कुटुंबपद्धती मुळे घराचा सुकाणू पतीच्या हाती असणे ( पितृसत्ताक कुटुंबपद्धतीचे प्राबल्य असले तरीही कुठे - कुठे मातृसत्ताक कुटुंबपद्धतीचे अवशेष काही जमातींमध्ये आजही आढळून येतात .) ... इत्यादी काय ?
संपूर्ण भूतलावर मानवनिर्मित नात्यांमध्ये पती - पत्नी इतकं दुसरं श्रेष्ठ नातं नाही . मध्यमवर्गीय व उच्च वर्गीय स्त्री पेक्षा निम्नवर्गीय व ग्रामीण स्त्री ची घरासाठी राबणे , कष्ट करणे ह्याची क्षमता किती तरी जास्त आहे . परंतु अतिकष्टाच्या जीवनामुळे ह्या वर्गातील स्त्री - पुरुषांच्या कोमल भावना करपून एक रांगडेपणा आलेला असतो व त्यांच्या भावनांची अभिव्यक्ती शिष्ट , औपचारिक व सुसंस्कृत न राहता त्यात एक प्रकारची प्रखरता आलेली असते व आपला दृष्टिभ्रम होतो .
प्रेमभावनेचा सात्त्विक आविष्कार म्हणजे श्रध्दा !
प्रेमभावनेचा राजस आविष्कार म्हणजे स्नेहभावना !
प्रेमभावनेचा तामस आविष्कार म्हणजे असहिष्णुता !
_ ह्यात श्रध्दा व असहिष्णुता अगदी टोकाच्या भावना आहेत ; ज्या ग्रामीण व निम्नजनांमध्ये आढळतात व आपला गैरसमज होतो .
अधिकार , हक्क व कर्तव्याची सापेक्ष भावना कृत्रिम , हिशोबी व कागदी आहे .
जर पती पत्नीचे व्यक्तिमत्त्व खरोखरच एकरूप झालेले असेल तर त्याला पाण्याची उपमा देणे उचित ठरेल . पाण्यालाच आपण जीवन म्हणतो . पाणी हायड्रोजन व ऑक्सिजन मिळून बनलेला आहे . ( आता त्यात हायड्रोजनचे दोन अणू व ऑक्सिजनचा एक अणू _ असा हिशेब मांडू नये . ऑक्सिजनचा एकच अणू असला तरीही प्राणवायू तोच आहे . ) . आता येथे कसली मुक्ती पाहिजे ? कारण मुक्ती म्हणजे पाणी ( जीवन ) नष्टच होणार ! आणि जर शुध्दता पाहिजे असेल तर ती तुमच्या मानसिकतेच्या गाळणीवर अवलंबून आहे .
स्त्री वरील अन्याय कायद्याच्या मदतीने दूर करणे म्हणजे ' आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी ' असेच होईल . पती - पत्नीचे तरल भावबंध कायद्याच्या रुक्ष दोरखंडाने सांधताच येणार नाही .
कृत्रिम , जीवनाच्या हिशेबी बंधात कायद्याच्या मदतीने जगण्यापेक्षा नैसर्गिक जीवनाच्या उत्कट भावबंधाची एक - दुसऱ्या प्रति
" हद से गुजर जाना " ची उर्मीच जास्त गरजेची !
लेखक : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment