शियान ---- ग्रामीण प्रेमकथा!
' प्रदीर्घ भाषिक अवकाश असलेली , सामाजिक आशयसूत्रांचे नानाविध पदर अनेक पात्रप्रसंगासह साकल्याने मांडणारी विस्तृत संरचना म्हणजे कादंबरी ' , ही भालचंद्र नेमाडे यांची कादंबरीची व्याख्या मला अधिक जवळची वाटते. कथात्मकता आणि वास्तवता प्रमुख गुणधर्म कादंबरीत असतात.
लेखकाने निर्मिलेले कल्पित रूप तसेच विशिष्ट व्यक्तींच्या संदर्भात आणि विशिष्ट कालावधीत घडलेली भाषिक घटना म्हणजे कादंबरी....
कोणतीही कादंबरी वाचताना , प्रतिक्रिया देताना ती कादंबरी ' वाङ् मय प्रवाहाच्या.... प्रवासाच्या ' कोणत्या टप्प्यात येते , हे बघने प्राथमिक कर्तव्य ठरते...
सातव्या शतकात बाणभट्टाने संस्कृतमध्ये ' कादंबरी ' लिहिली तेव्हापासून कादंबरी हा शब्द रूढ आहे. कादंबरीचे मूळ रूप जरी कथा परंपरेत मिळते तरी अर्वाचीन उदयास आलेला कादंबरी हा वाङ् मय प्रकार ठरतो. आपल्या कडे मराठी कादंबरी ही इंग्रजी राजवटीत जन्माला आली असली तरी पूर्वी पासून पुराणे , आख्याणे , बखरी इ. तून कादंबरीची अंगोपांगे जाणवत होती. हरीभाऊ आपटे काळात वास्तव वादी कादंबरीची सुरुवात झाली. ह्याच काळात धनुर्धारींची पहिली ग्रामीण कादंबरी म्हणजे " पिराजी पाटील ". ग्रामीण कादंबरी ला समांतर अशी प्रादेशिक कादंबरी ही उदयास आली. स्वातंत्र्य पूर्व काळातील प्रेरणा व स्वातंत्र्य उत्तर काळातील प्रेरणा ह्यात महद् अंतर आहे. नव्वदीपर्यंतचे ग्रामीण जीवन , गावगाडा , संपन्न कृषी जीवन नव्वदीनंतर पार उध्वस्त झाले. विसाव्या शतकाच्या अंतीचे रम्य ग्रामजीवनाचे चित्रण आपल्याला ' शियान ' मध्ये अनुभवायला मिळते. ग्रामीण भाषेचा लहेजा , वऱ्हाडी बोलीची सहजता , शब्द माधुर्य , त्या त्या वयातील भावभावनांचा कोलाज ' शियान ' समर्थपणे प्रस्तुत करतो. अमरावती - अकोला जिल्ह्यातील अस्सल ग्रामजीवनाचा धांडोळा घेताना ही कादंबरी तेथील भावभावनांसोबतच विविध नात्यांचा गुंता ही सहजपणे मोकळा करते. ह्या कादंबरीचा अवकाश जरी दीर्घ कथेसारखा असला , घटनांची पुनरावृत्ती असली तरीही भुतकाळाला कवेत घेऊन वाङमय विश्वाच्या जत्रेत ती लेखकाच्या खांद्यावर बसून कुतुहलाने हा शब्द पसारा निरखत आहे. प्रादेशिकतेची झालर लेवून , ओच्यात वऱ्हाडीच्या अविट शब्द कळ्या घेऊन मोठ्या अवखळ आत्मविश्वासाने ही कादंबरी आपले छोटुले सकवार पाऊल मराठी वाङमयाच्या सृजनशील काळ्या मातीत उमटवित जाईल. रिध्दपुर ह्या मायमराठीच्या माहेरात अंकुरलेली ही कादंबरी जन्मजात गुण घेऊन वाचकाला भूतकाळाची मधुर उत्कट अनुभूती देते. कुठे कुठे धक्के ही देते ! कादंबरीतील स्त्री पात्रे ग्राम्य आक्रमकपणा तसेच पुरुषी बोल ( जसे " बे " ) घेऊन वाचकाला सामोरे जाते. वाचक दचकतो . प्रसंगांची विपुलता कमी जाणवते.
प्रेम ही चिरंतन जाणिव व भावना आहे. १९६० नंतर कादंबरीच्या प्रवाहात काही नव्या जाणिवा दिसू लागतात . त्यात अस्तित्व वादी , जनवादी, ग्रामीण, ऐतिहासिक, चरित्रात्मक, दलित व मनोविश्लेषणात्मक अशा विचारधारा दिसतात. त्यातील ग्रामीण विचारधारेशी ही कादंबरी नाते सांगते. वास्तव तसेच वंचना, वासना, विकार ह्यातून माणूस शोधण्याचा अल्पसा प्रयत्न ह्या कादंबरीतून केला आहे. ती कलावाद , बोधवाद यांचेपर्यंत पोचत नसली तरीही रंजनाचे व शब्द विन्यासाचे पुट लेवून ती उभी आहे.
राजकारण, समाजकारण व अर्थकारण यांनी नव्या दिशा लाभलेल्या ग्रामीण जीवनात जी गुंतागुंत निर्माण झाली आणि ग्रामीण जीवन ढवळायला सुरुवात झाली , नवी आव्हाने निर्माण झाली याचे मंद पडसाद ह्या कादंबरीत जाणवतात.
भाषिक आविष्कार लेखकाच्या समृद्ध अनुभवाची शिदोरी तसेच त्याच्या वैचारिक व प्रगल्भ जाणिवेतून सिध्द होत जातो... सुरुवातीच्या साहित्य कृती रांगत्या बाळाप्रमाणे मोहक असतात. नंतर त्या प्रौढ होत जातात. व शेवटी वाङमय पटलावर ताऱ्यांप्रमाणे अढळ स्थान प्राप्त करतात....
लेखक तीव्र ग्रामीण भावना बाळगून आहे. वऱ्हाडाचे वास्तव व वऱ्हाडीचे शब्द त्यांचा अविभाज्य भाग असल्याने सकस शब्द कृती ते लीलया निर्माण करतात. उत्तरोत्तर ह्या साहित्य कृती प्रगल्भ वैचारिक मंथन व तीव्र सामाजिक जाणिवा घेऊन वाचकांपर्यंत पोहोचतील अशी आशा व्यक्त करतो.
आदरणीय सुरेश दादा देशमुख आपण सु पु दादांच्या शियान या कादंबरीचे खूप सुंदर समीक्षण केले
ReplyDeleteधन्यवाद विशाल भौ..
Deleteमनात आलं तसं लिहिलं....
धन्यवाद विशाल भाऊ...
ReplyDeleteधन्यवाद दादा
ReplyDelete