माही उभवली तूर
माही उभवली तूर
डोऱ्या लय आला पूर
माह्या घासाचं सपन
झालं देवा चूरचूर ।। धृ.।।
लाल्या पराटी वरचा
बोंड अरीचा यी मार
वावरातल्या अगासी
लडे चंदरा ची कोर ।। १।।
संतराच्या बगिच्यात
लिंबा वानी गा संतर
घामाच्याच वलीताचं
कुठं चुकलं तंतर ।। २ ।।
घेंग गेली गा सोल्याले
चिमे वटान्याची वर
साजवनीच्या दिसाचा
रुसला गा मोह्यतूर. ।। ३ ।।
जलमो जलमीचा ह्या
मरे पावतर घोर
कोन्या दुस्माना च्यानं
दिठावलं गा वावर. ।। ४ ।।
कास्तकाराचा जलम
इठू नामाचा गजर
वावरात वारी वानी
माह्या चालते वखर. ।। ५ ।।
संबा पाराबती माहे
हाये गनगोत थोर
हात पाय हे मातीचे
त्याले पान्या वानी जोर. ।। ६ ।।
माहे बोटं कोंबावते
मनऽ हिरवं वावर
मातीच्या गरभा तून
पिकवतो गा भाकर. ।। ७ ।।
माह्यं सिकस्यन् मातीचं
उभे आडवे काकर
धरतिरीच्या कुसीत
माहे हिरवे अकस्यर. ।। ८ ।।
हमी भावाचं गनित
कोन्या येड्याचं मंतर
चाल चालता सपेना
तोंड पोटाचं अंतर. ।। ९ ।।
मले ग्यान नको पाजू
तुही चोट्ट्याची नजर
माह्या मनात गुनीले
तुह्या मनी भागाकार. ।। १० ।।
कवी : सुरेश महादेवराव देशमुख
नागपूर
No comments:
Post a Comment