धाक भेवानं घेरलं
मन साहते पराणी
एकांताची ही सोबती
गर्दी वाहते विराणी ।। धृ. ।।
वर्दी पोशाखाची छाया
इतिहासाची कहाणी
काय रयतेचा गुन्हा
रंगा रंगाची निशाणी. ।। १ ।।
वर्ण वणवा पेटला
त्याला अडवे ना कोणी
राख रांगोळी स्वप्नांची
झाली घरट्याची हानी. ।। २ ।।
कळपात कलहाची
धुरकऱ्याची पेरणी
रोप भांगेचं लावलं
नाही तुळस अंगणी. ।। ३ ।।
नाव धनासाठी सारं
खाई टाळू चे ही लोणी
सत्ता हातात घेऊन
साळसूद आव आणी. ।। ४ ।।
सर्व साधारण जन
त्यांचा वाली नाही कोणी
गर्द आमावस्ये ची च
बोटी शाईची निशाणी. ।। ५ ।।
वणवण पोटासाठी
तळमळते रांधणी
भान समूहाचं सैल
कशी करावी बांधणी ।। ६ ।।
महाभारत मोठ्यांचं
धूळधाण रणांगणी
रक्त सैनिकांचे साक्षी
पोटासाठी जिंदगानी ।। ७ ।।
हाव आसुरीच्या पायी
युगे युगे मनमानी
चिरडले भरडले
कथा गाथा पानोपानी. ।। ८ ।।
जीव किडा मुंगीचा ही
पशू पक्षी झाड दानी
कधी माणूस गाईल
निसर्गाची बोध गाणी. ।। ९ ।।
काय आभाळाचा गुन्हा
एकसारखा दे पाणी
पोट सर्वांचं भरते
दोषी आहे का धरणी. ।। १० ।।
--- सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment