सरवा - भाग १९
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली
परभ्या लिवून रायला व्हता . माय मजूर घिवून वावरात गेलती . झाक पडल्या माय घरी आली .
' दाआजी अजून आले नाही का बापू ? ' मायनं हातपाय धुता धुता इचारलं .
' नायी नं... थांब फोन लावतो .' परभ्यानं मनलं .
' दाआजी , किती येळ हाये अजून घरी याले ? ' परभ्यानं मोबाइलवर पुसलं .
' आलो बटा.. गावाजवरच हावो.' दाआजीनं मनलं.
माय रान्नीत सयपाक करत व्हती .
' डगऽ ... डगऽ.....डगऽ....' असा आवाज करत दाआजीची फटफटी आवारात आली .
' बापू... इकडे ये मा .' दाआजीनं आवाज देल्ला .
फटफटीवर दाआजीच्या मांगं येक पोरगा कायीतरी सामान घिवून बसला व्हता . परभ्यानं थ्या पोराजवरचे येक येक खोके घिवून मोठ्या सपरीत आनले . दोन मोठे खोके आन् दोन लहान खोके व्हते . दाआजीसंगं थो नवाडा पोरगा सपरीत आला . मायनं गरम पानी आंगधुनीत निऊन ठिवलं . दाआजी हातपाय धुवाले गेले .
' काय हाये याच्यात ? ' परभ्यानं हरुच थ्या पोराले इचारलं .
' काम्पुटर हाये ...' थ्या पोरानं मनलं .
' काय ? ' परभ्यानं अचंब्यानं मनलं .
परभ्याचे दाआजी हातपाय पुसत सपरीत आले , तसाच परभ्या त्यायले जावून बिलंगला .
' तुमी काम्पुटर आनला ! ' परभ्यानं वरतं पाहात इचारलं .
' हो... तुले पायजे व्हता नं.' दाआजीनं हरदमवानी त्याच्या केसातून बोटं फिरवत मनलं .
परभ्या तसाच रान्नीकडं पराला . माय ग्यासजवर कपात चाहा वतत व्हती . परभ्या पाठमोऱ्या मायले बिलंगला .
' माय ऽ... माय... दाआजीनं काम्पुटर आनला.. लवकर चाल नं सपरीत .' परभ्यानं मायचा हात वढत मनलं .
' अरे... चाहा त गारु दे .. ह्या चाहा बाहिर निऊन दे.. मी येतो .' मायनं कवतिकानं मनलं .
परभ्यानं दाआजी आन् थ्या पोराले चाहा देल्ला आन् दाआजीच्या मांडीवर जावून बसला .
' बापू... खाली उतर.. चाहा पिऊ दे नायी त सांडसुंड व्हयीन . ' मायनं परभ्याले मनलं .
' मी नायी जा...' परभ्यानं दाआजीले कप्पं पकडत मनलं .
दाआजीनं इस्याऱ्यानच मायले समजावलं .
' बापू तुह्या टेबलावरचं सामान उचल आंदी.... तिथं काम्पुटर लावाचा हाये .' दाआजीनं परभ्याचा लाड करत मनलं आन् चहाचा घोट घेतला .
चटकन् उतरत परभ्यानं टेबलावरचं सारं सामान उचलून ठिवलं . थो पोरगा येकेक खोका उघडाले लागला . परभ्या त्याच्या जवरच उभा व्हता . थ्या पोरानं सारं सामान टेबलावर मांडलं आन् वायरं जोडाले लागला . परभ्या येकेक गोस्ट ध्यान दिवून पाहात व्हता . थ्या पोरानं येक वायर पलग मंदी लावाले सांगतलं . परभ्याचा काम्पुटर चालू झाला . थोड्या येळानं त्यानं तीन चार सीड्या परभ्याजवर देल्ल्या आन् बराबर ठिवाले सांगतलं . त्यानं परभ्याले कायी जोड जंतर आन् काम्पुटर चालवाचे मंतर सांगतले . मायनं आरती आनली .
' तुमी करा पूंजा , मी ह्या पोराले सोडून येतो .' दाआजीनं हासत हासत मनलं .
परभ्या आन् मायनं पूंजा केली . गायीच्या टिनमन्याच्या आवाज आला. माय आंगनात गेली . बंडी बी आलती . तेवढ्यात सद्या आन् वस्या बी हाजर झाले . त्यायले कसं मालुम झालं त देव जाने !
' पानी घ्या जी उलिसं .' गड्यानं सपरीत येत मनलं .
' बाप्पा ! का आनलं गा बापू ?' गड्यानं परभ्याच्या टेबलाकडं पाहात इचारलं .
' काम्पुटर व्हय ... आत्ताच आनला दाआजीनं ! ' परभ्यानं काम्पुटरकडं पाहातच मनलं .
माय पानी घिवून आली . गायकी बी गाई बांधून आला . परभ्यानं साऱ्यायले काम्पुटर कसा चालते , थे दाखवलं .
' चाहा घ्या जी .' मायनं दोनी गड्यायले आवाज देल्ला .
' आता बापू नायी आटपत ! ' गड्यानं चाहा पेता पेता मायले मनलं .
' आपला बापू हायेच हुस्यार ! ' गायक्यानं मनलं .
' तुमाले का समजते बे त्याच्यातलं .' गड्यानं सद्या आन् वस्याले मनलं .
' समजन न त्.. .. बापू सिकवते आमाले .' सद्यानं मनलं .
' बापू तुमाले सिकवन का आपला अभ्यास करन रे ...' गड्यानं दुधासाठी बालटी घेत मनलं .
परभ्यानं मोबाईलच्या हाॅटस्पॉट वर काम्पुटर चालू केलता . टिचभर मोबाईल आन् दिड हात मॉनिटर ... परभ्या त हरखूनच गेलता ! परभ्याच्या मायनं तिघायसाठी तीन वाटीत बासुंदी आनून देल्ली . तीघयी माकोड्यासरखे काम्पुटरले चिपकले व्हते .
' हे खाऊन घ्या रे पोर हो ..' मायनं त्यायले वाट्या देत मनलं आन् रान्नीत गेली .
परभ्याचे दाआजी आले . सद्या न वस्या घरी गेले .
' कापसाचा चुकारा भेटला आज . मनलं बापू साठी पह्यले काम्पुटर घिवून घ्याव . लय नांदा लावला व्हता न...' दाआजीनं जेवता जेवता मायले सांगतलं .
' बरं केलं जी ... त्याले पायजेच व्हता मना तसा ..' मायनं गरम गरम पोळी वाढत मनलं .
परभ्या पट्कन जेवन करून उठला आन् काम्पुटर जवर येऊन बसला .
आता काम्पुटरच परभ्याचा गुरजी झालता . सारे कलास , परिकस्या आता काम्पुटरवरच !
होते , नायी होत मनता मनता परभ्याची येक मह्यना लेट परिकस्या झाली . मांग पुढं व्हता व्हता येकडावचा निकाल लागला .
परभ्या त्याच्या स्याळंतूनच नायी त तालुक्यातून पह्यला आलता . परभ्याचा पेपरात फटु आला . त्याच्या स्याळंच्या आन् कलासच्या बाहिर यी मोठ्ठ्या बोरडावर परभ्याचा फटु लागला व्हता . स्याळंत , गावात परभ्याचीच चरचा व्हती . परभ्याच्या मायले त का आन् कसं बोलाचं , हेच सुधरुन नायी रायलं व्हतं . मांगच्या साली कोरोनानं कोनताच सनतिवार ढंगानं केला नोता . पन् आता त परभ्याच्या घरी दसरा - दिवारीच व्हती . परभ्याच्या कवतिकात त्याचे मायबाप आपली तंगी , दुख दरद सारेच इसरुन गेलते . पुढच्या सिकस्यनासाठी त्यायले सल्ल्यावर सल्ले भेटून रायले व्हते . थे अरधे त सल्ल्यानच दांदरुन गेलते ..... ( क्रमशः )
लेखक : इंजि . सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
खूप मस्त लिखेव जी.
ReplyDeleteधन्यवाद सर
Delete