रुत मातला मातला
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली भाषा
रुत मातला मातला
उतमातला कोपला
रुते कायजात काटा
उभा संसार पेटला ।धृ।
घाती पेरणीच्या भाऊ
माह्या कापूस खपला
माल बेपाऱ्याचं सोनं
माह्या मातीमोलातला ।१।
स्याया कालेज यी बंद
सिकस्यनाचा घपला
डवंडरते गा पोट्टे
तुमी किती बी हाकला ।२।
केलं करजं काढून
पेरनीचा झोलझाल्या
रदवलं गा पान्यानं
यम देवाचाच हल्या ।३।
सोयाबीन कुईजली
येचा कापसाचा गेला
सोन्यावानी फसलीचा
कसा सत्यानास केला ।४।
गरसोरी इकूनच
मोबाईल ह्या आनला
पोट्टे गुतले त्याच्यात
खेव घराले आनला ।५।
धीर ठेवाचा गा किती
जीव आदमुस्या आला
कोन्या जलमाचं पाप
भोग नसीबाले आला ।६।
वर चंदर माडीचा
त्याले कोनं भुलवला
भुलाबाईच्या गान्यात
फुल दुखाचा ओयला ।७।
किती सुख लपवतं
खिरापती आता खोला
गडीसाकरीचा खडा
असा कसा उबजला ।८।
नाही जीव रे आंगात
इरे मनाचा यी ढेला
डोये लागले झुरनी
जीव मातीत सपला ।९।
येड्याबांगड्याची सेवा
निवद रे गोपालकाला
आता लक्षुमी रूसली
सन दिवायीचा आला ।१०।
रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment