अंकिता
Marathi language _ मराठी भाषा
स्त्री जन्मा तुझी अजब कहाणी
हृदयी अमृत नयनी पाणी......
नावातच अंकित झाली ह्या पुरुषी मानसिकतेची...
आदीम अवस्थेत असताना एका ज्येष्ठ आईच्या आज्ञेत राहणारे कुटुंब आज तिच्याच मुळावर उठलेत... असे कसे ?
निसर्गाशी तादात्म्य पावलेले आदीम जीवन कष्टाचे , जोखमीचे होते . स्थिर नव्हते . रोज नव्या बदलांना सामोरे जाताना ते गोंधळले जरूर पण तुटले नाही.. लवचिक राहाले . लिंगभेद माहीत नसणारा ... बाकी प्राण्यांपेक्षा शरीराने कमकुवत असणारा मानव प्राणी आज हिंस्र पशू का झाला ?
ह्या माय माऊलींच्या कल्पकतेने , ज्ञानाने , जिज्ञासेने , निरीक्षण बुध्दीने अन्न निर्मितीचा सुलभ उपाय आपल्याला गवसला ; तो शेती ! भटक्या जीवनाला व अन्नासाठी दाही दिशा फिरणाऱ्या मानवाला स्थिरता आली ती शेतीमुळे . आजच्या प्रगतीची मुहूर्त मेढ उभारल्या गेली . साहित्य प्रसवले . ... निसर्गाचे गूढ उकलले . दुसऱ्या टोळ्यांना जिंकून , गुलाम बनवून त्यांना शेतीसाठी राबवले व येथेच माशी शिंकली . गुरेढोरे , गुलाम ह्यांच्या कक्षेत भिरकावून दिली गेली स्त्री ... अनंत काळासाठी . ती आता कुटुंबाची सदस्य न राहता वस्तू बनत गेली . यंत्र बनली भोगाचा . साथीच्या आजारासारखी पसरत गेली पितृसत्ताक कुटुंबपद्धतीच्या समाजाची साथ . उध्वस्त केले त्या ' स्त्री ' नावाच्या वस्तूचे जीणे . रक्ताच्या थेंबा - थेंबात भिनली ती पीढ्यान पीढ्या .
वस्तू म्हटले की किंमत आपोआप चिकटते.. कपाळावरच्या कुंकू सारखी . मुलं जन्माला घालणं , एवढंच त्या यंत्राचे काम . बाजारभावाने विकत घ्यायचं , नाही तर पळवून न्यायचं , नाही तर हिसकावून घ्यायचं .... उपभोगायचं... संपलं ; ह्या पलीकडे अस्तित्वच काय तिचं ? सगळे नियम , संस्कार स्त्रियांसाठी .... शील , चारित्र्य वगैरे चकचकीत वेष्टणासह .
नर आणि मादी ह्या एकाच नात्याभोवती परिक्रमा करतो आमचा मेंदू ; मग तो देव असू देत का दानव असू देत -- सगळे ह्याबाबतीत सारखेच !
एका सक्षम व सारख्याच असणाऱ्या सृजनशील मादीला ' नरकाचे द्वार ' म्हणण्यापर्यंत कुजलेत आमचे विचार .... सडलेत मन... रडलेत पीतर .
' मुलगी वाचवा , मुलगी शिकवा ' हा स्लोगन चक्क आरसा आमच्या प्रशासनाचा .... समाजाचा . जाहिरात करताना गहाण बुध्दी व माणुसकी सुध्दा !
' मुलगी वाचवा ' असे लिहिताना टराटरा बुरखा फाटतोय ह्या भुसभुशीत , विकृत पुरुषी समाजमनाचा .
' मुलगी वाचवा ' ? , म्हणजे ह्या आधी ती मारायची , शिकार करायची गोष्ट होती ? डोकं सुन्न होतंय .
बलात्काराचे गुन्हे वाढण्याचे कारण निर्लज्जपणे सांगता काय ? _ फॅशन , तोकडे कपडे... कै . विद्या बाळ विचारतात , स्त्री निर्वस्त्र असली म्हणून तिला उपभोगायचच , हे पुरुषी मनात येतंच का ? त्याचं उत्तर आहे , हजारो वर्षांपासून तिला अलगद माणसांतून काढून वस्तूत नेऊन ठेवण्याचे विखारी षडयंत्र . आणि अशा घटना म्हणजे पुरुषी मानसिकतेच्या अहंकाराचे विषारी फुत्कार . पाखंडी तर एवढे की देवीच्या मखरात ही बसवायचं आणि सरणावर जिवंत ही पेटवायचं ....
_ अंकिता , तुझ्या वेदनेला ... मृत्यूला कोण कारणीभूत ?
लेखक : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment