Sunday, January 2, 2022

सरवा - भाग २६. varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

सरवा - भाग २६
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

परभ्या सुक्करवारीच नाप्पूरसाठी निंगाला . गावाले कवा जातो न् कवा नायी , असं त्याले झालं व्हतं . सनवारी सकारीच थो नाप्पूरले पोहोचला , मंग गावाले आला . आवारात लाह्यनी जोडी न् लाल्या बयील येकटाच खुट्याले बांधून व्हता . परभ्यानं ब्याग ठिवली न लाल्याची मान कवटारून त्याचा लाड कराले लागला . रिकाम्या खुट्याकडं पाहून दोघायच्या यी डोऱ्यातून आसू गरुन राह्यले व्हते . सद्या न वस्या बी आले . परभ्याले पाहून मायले बी दुख आटपलं नायी . परभ्याले कवटारून थे बी लडाले लागली . 
दाआजीच्या फटफटीचा आवाज आला . माय पानी आनाले रान्नीत गेली . 
' आला का बटा....' परभ्याले पाह्यताच दाआजीनं मनलं . 
परभ्यानं दाआजीचे पाय लागले आन् त्यायले बिलंगून लडाले लागला . 
' लडू नको.. आंगपाय धू आन् जेवून घे पह्यलं .' दाआजीनं परभ्याले थापटत मनलं . 
परभ्यानं जबरदस्तीनं सद्या न वस्याले बी जेवाले बसवलं . जेवल्यावर तीघायची वरात वावराकडं निंगाली . पांढऱ्या बयलाले बांधोडीजवरच समाधी देलती . त्याच्यावर येक मोठाजात कारा पास्यानी चिरा उभा केलता . सेंदरानं सेंदरी झालंल्या थ्या चिऱ्याले तीघायनं बी सेंदूर लावलं . उदबत्ती आन् कापूर लावून पाया पडले . 
सिवारातले मांडवं खाली झालते . वाघाच्या भेवानं साऱ्यायनं आपल्या गाई मसी घरी नेलत्या . रातच्या जागलीले बी गडीमानसं जाले भेवत व्हते . रातीचं सोडा पन दिवसा बी जवरपासच्या गावाच्या सिवारात काम कराले लोकं काचले व्हते . आता सिवारात त येकट्या दुकट्याची जाची हिम्मतच नायी व्हती . बगिच्याचा सोकारी बी रखवालीचं काम सोडून गेलता . लाखा - लाखाचे संतऱ्याचे बगिचे भगवान भरोसेच व्हते . 
' आपल्या गावाकडं कंदी व्हते का गा वाघं? सरकार आनून सोडते मनते बावा वाघं इकडे . कायच्या साठी सोडते त काऊन ची बीन ! मी त बावा गावाजवर सडकीच्या सूलपानंच बकऱ्या चारतो . ' सद्यानं मनलं . 
' फारेस्टवाले आलते न वावरात पंचनाम्यासाठी .' वस्यानं सांगतलं . 
' थे येतेच वरातीमांगून ... कागदं कारे केले क झाली त्यायची डिवटी . त्यायले कायची सरदीगरमी हाये बे , जीव त आपला जाते नं .' सद्यानं मनलं . 
इतवारी परभ्या नाप्पूरले आन् सोम्मारी सकारी अवरंगाबादले पोहोचला . दोन- च्यार दिवस परभ्या आपल्याच गुताड्यात व्हता ... हासनं नायी बोलनं नायी.
आज निधीचा वाढदिवस व्हता . परभ्यानं दुपारी क्यांटीनमंदी केक बलावला . निधी जसी क्यांटीनमंदी आली , तसंच साऱ्या पोरी - पोरायनं , ' बार बार ये दिन आये.....' हे गानं जोरानं मनाले सुरवात केली . क्यांटीनभर येकच कल्ला ! परभ्यानं निधीले बसवलं आन् तिच्यापुढं टेबलावर केक ठिवला . निधी पार कोचंबून गेलती . पोट्ट्यायचं खानं कमी न् धिंगानाच जास्त .
कलास सुटल्यावर निधी परभ्याजवर आली . 
' धन्यवाद केक बद्दल , परंतु कॉलेजमध्ये कशाला आणलास ?' निधीनं जरास्या नाराजीनंच मनलं . 
' काय झाले..... चुकलो असेल किंवा तुला आवडले नसेल तर माफ कर ....' परभ्यानं मनलं आन् होस्टेलकडं जा साठी फिरला . 
' अरे रागावला का ? तुला दुखवायचा हेतू नाही माझा.... तुला आपल्या क्लास मधली मुलं कशी आहे ते माहित आहे ना... Any way . पुन:श्च आभार , आणि हो तू आणि सुनील आज रात्री घरी या . छोटीशी पार्टी आहे . आणि कारणं नकोत हं... येशील ना रे ? ' निधीनं मनलं . 
' बघतो...' परभ्यानं खालच्या माननं मनलं .
' बघतो काय ? यायलाच हवं ... माझ्याकडे बघ...' निधीनं परभ्याच्या हनोटीले हात लावून चेहरा फिरवत मनलं . 
टपकन् परभ्याचा आसू तिच्या मनगटावर पडला . निधी गसपटून गेली . 
' काय झालं प्रभाकर ?.... माझ्या बोलण्यामुळे का ?' निधीनं इचारलं . 
' नाही ग... माझ्या बावळटपणामुळे ...' परभ्यानं डोरे पुसत मनलं . 
' नाही.. माझं बोलणं तुझ्या मनाला फार लागलं ना... आम्हाला फार मर्यादा असतात रे.. please , रागाऊ नकोस , माफ कर.. ' निधीनं कान पकडून मनलं . 
' नाही.. leave it... पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! ' परभ्यानं मनलं . 
' येतोय ना घरी ? मी location पाठविते तुला... नक्की ये हं... बाय . ' निधीनं मनलं . 
येकडावची परीकस्या झाली . आता उलीसी निचनताई होती . 
' रविवारी चलतेस का , वेरुळ फिरून येऊ या..' परभ्यानं निधीले इचारलं .
' रविवारी तर शक्यच नाही.. आणि कारणं तर विचारुच नकोस ... भरपूर आहेत .' निधीनं हासत जवाब देल्ला . 
' मग कधी ?' परभ्यानं इचारलं . 
' आई - बाबांची परवानगी , हा मोठा issue आहे . मी शुक्रवारी सांगते .' निधीनं मनलं . 
' Ok.. हरकत नाही...' परभ्यानं मनलं . 
परभ्याच्या मनात धाकधूकच व्हती . निधीचं जमनार नायी , असंच त्याले वाटत व्हतं . 
शुक्रवारी आल्या आल्या दोघांची भेट झाली . 
' हाय..' निधीनं मनलं . 
' हाय... काही खूषखबर आहे की नाही ?' परभ्यानं इचारलं . 
' नक्कीच आहे... पण किती convey करावं लागलं , काय सांगू तुला... शनिवारची परवानगी मिळाली आहे , काही अटींवर . घरून डबा न्यायचा , बाहेरचे काहीही खायचे नाही आणि ५ वाजेपर्यंत घरी परतायलाच लागेल . ' निधीनं सांगतलं . 
' सब शर्ते मंजूर है जहापनाह...' परभ्यानं निधीसंगं हासत मनलं . 
आज परभ्याच्या डोऱ्यात झोप कायी याले तयार नोती . थो पह्यल्या डावच जगपरसिध्द येरुळ पाह्यनार व्हता , थे बी निधीसरख्या सोबतीनीसंगं ! परभ्याच्या जीवन पुस्तकाचे पानं फडफडाले लागले . पन् त्यायच्यावर काय लिवलं हाये , हे कोनालेच ठाव नोतं . 
' कोनाले बी फसवते जीवनाचे गुताडे ,
गुतून जीव त्याच्यात सोताच तडफडे .' 
सकारीच परभ्या न् सुनील निधीच्या घरी गेले . कनक याचीच व्हती . निधीच्या बाबानं परभ्याची इचारपूस केली . सरवायनं नास्ता केला . निधीच्या मायनं डबा देल्ला . कनकचा आतापावतर याचा पत्ताच नोता . निधीचे फोन वर फोन चालू व्हते . येकडावची कनक आली आन् मंग पोहा निंगाला महादेवा ! 
कनकच्या गाडीवर निधी बसली अन् निधीची गाडी परभ्यानं घेतली . कनकची गाडी पुढं आन् मांगं मांगं परभ्या . देवगिरी किल्ल्याजवर कनकनं गाडी थांबवली . निधी परभ्याले येका दुकानात घिवून गेली . 
' उन्हाचं डोक्यावर काही नको का ? ' निधीनं दुकानातल्या क्याप पाहात परभ्याले मनलं . 
ओढनीनं चेहरा झाकलेल्या निधीच्या डोऱ्यावरून , थे रागानं मनून राह्यली क लाडानं , हे कायी परभ्याले समजलं नायी . 
' मी नाही घालत कॅप ...' परभ्या मास्कच्या आडून पुटपुटला . 
' नाही घालत म्हणजे ? ... ती कॅप द्या दादा.. ' निधीनं क्याप घेत मनलं . 
जबरदस्तीनं त्याले क्याप घातली . 
' आधी किल्ला बघूया , नंतर लेणी ... ठीक आहे..' निधीनं मनलं . 
निधी अन् कनकचं हे पाह्यनीतलंच व्हतं . फक्त परभ्या न् सुनीलच पह्यल्या डाव आलते . 
किल्ला चढता - उतरता सारे घामाजोकर झालते . पान्याच्या च्यार बाटला खतम झालत्या . भूकीजले पन् व्हते थे . येका हटेलात चवघायनं डबा खाल्ला . परभ्यानं जांबा घेतल्या . 
आता लेन्यायचा नंबर व्हता . परभ्या पह्यल्या डावच हे दगडातलं नवलाचं साजरपन पाहात व्हता . निधी परभ्याले येकेका लेनी आन् मूरतीची माहिती सांगत व्हती . महादेव पाराबतीच्या लग्नाची मूरती पाहून त् नव्या जिंदगानीच्या सपनाचे कोंभं परभ्याच्या इचारात फुटाले लागले . परभ्या भारल्यावानी कंदी मूरतीकडं अन् कंदी निधीकडं पाहात व्हता . तिनं सांगतच राहाव... बोलतच राहाव अन् आपन आयकतच राहाव , असं परभ्याले वाटलं . आज पह्यल्या डाव परभ्याचं आंग कयी येरा निधीच्या मुलाम आंगाले लागलं व्हतं ..... ढेकलावानी इरून राह्यला व्हता थो ! दिवसभऱ्यात किती डाव आंगावर काटे आले , हे त्याच्या बी गिनतीत नोतं . दिवऱ्याच्या सुगंधावानी मह्यकून राह्यलं व्हतं तिचं आंग ...‌ परभ्या सासा - सासात भरून घेत व्हता थो सुगंध ! कयलास लेन्यात हरीखला थो... पास्यानातल्या कोरीव कामाची सावली त्याच्या आंगावर पडली .... त्याचं यी मन कोराले लागलं आपली दुनिया ! 
' चार वाजले... निघायला हवे ..' निधीनं अयलान केलं . 
परभ्याची तंद्री तुटली . त्याचं मन निंगालेच तयार नोतं . 
फटुवायनं फुल्ल झालंली ग्यालरी पाह्यता पाह्यता रात सरून गेलती . त्यानं थे सारे ल्यापटाप मंदी सेव्ह केले . झुंझुरका सुनील उठला त् परभ्या ल्यापटापवरच ! 
' झोपला नाही अजून ? ' सुनीलनं मांगून परभ्याच्या खांद्यावर हात ठिवत इचारलं . 
परभ्या दचकला आन् स्यरमला बी !
' झोपतो.. झोपतो..' परभ्यानं पटकन ल्यापटाप बंद करत मनलं . 
पन् परभ्याचं मन कुठं थाऱ्यावर व्हतं !!
सुनील गालातल्या गालात हासत व्हता .....
( क्रमशः ) 

लेखक : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

No comments:

Post a Comment