सरवा - भाग २७
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली
पाह्यता पाह्यता आखरी सेमीस्टर आलं . सरवायनं इंटरनसिपसाठी कंपन्या पाहाले सुरवात केली . परभ्याचा इचार नाप्पूरातल्या कंपनीत इंटरनसिप कराचा व्हता . सुनील मुंबईत करनार व्हता . निधी आन् कनक अवरंगाबादलेच पाह्यनार व्हते , पन नायी जमलं त पुन्याले जानार व्हते . आता सारे सोबती फानोफान व्हनार व्हते .
जीवाची चित्तरकथा बी अजबच हाये . कायी दिवस कुठं बी राह्यला क तिथंच अकुराले लागते . ... मोठा व्हते तिथंच्या मातीच्या मायत . फुटते नवे कोंभं... जलमते नव्या फानट्या ! आपरंगच पसारा वाहाडाले लागते .
कितीक घाती येते न् जाते , पर येक मूर मातर पकडून राह्यतेच जलमगावच्या नारंची माती . दुसरीकडच्या पसाऱ्याच्या गुताड्यात किती बी हिलगलं तरी उलीसा का नसन , पन् जीव राह्यतेच गावात . सिकस्यन - पान्यासाठी , पोटासाठी सुटते गाव , पर सात - बारा वर राह्यतेच नाव !
हे गोस्टं त सिरफ साहाच मह्यन्याची व्हती . त्याच्या बाद बी त नवकरी - पान्यासाठी जिकडं भेटन तिकडं जा च व्हतं ! सिकस्यनाचे दिवस कंदी सरावच नायी , असं वाटते .... पर सरत्या येरले न् पान्याच्या धारंले थांबवनं आपल्या हाती थोडीच राह्यते .
परभ्याले नाप्पूरातल्या येका कंपनीनं बलावलं . त्याले आता आपला बाड - बिस्तरा घिवून गावाले जाचं व्हतं . सुनील बदलापूरले गेलता . परभ्यानं दाआजीले अवरंगाबादले बलावलं . परभ्याले खूसी बी व्हती आन् दुख बी ! त्यानं नाप्पूरले जा चं हाये मनून फोन करून निधीले सांगतलं . निधीनं परभ्याले घरी बलावलं . झाक पडल्या थो निधीच्या घरी गेला . आज परभ्याले पाहुनचार व्हता . निधी गुपचापच व्हती . परभ्यानं निंगाच्या येरी निधीच्या माय - बाबाचे पाय लागले .
' आठवण ठेवशील रे बाळा ...' निधीच्या मायनं येक क्यारीब्याग परभ्याले देत मनलं .
' हे कशाला ?' परभ्यानं कोचमून मनलं .
' असू दे..' निधीच्या बाबानं परभ्याची पाठ थापटत मनलं .
निधी आन् परभ्याची झुंझुरकावरी च्याटींग चालू व्हती . दोघायचा यी जीव येकमेकात गुतला व्हता . सकारी - सकारी परभ्याचा डोरा लागला .
दरवाज्यावर टकटक झाली . दरवाजा उघडला त् पुढं निधी ! परभ्यानं दरवाजा लावला तसी निधी त्याले बिलंगली आन् लडाले लागली . लोन्यावानी इरत गेली थे परभ्याच्या कवट्यात ! परभ्या त् पह्यले दांदरला . आता पावतर दोघायनं बी आपल्या मनाची गोस्ट मनातच लपवली व्हती , पर ताटातूटीच्या भेवानं दाबून ठिवली थे भावना येकदम उफांडून आलती . होठं मुके व्हते पन् डोऱ्यावाटं बरसून राह्यल्या व्हत्या थ्या दोघायच्या बी . परभ्यानं हरु हरु तिले थापटलं आन् कपाराचा मुका घिवून बसवलं . निधीचे डोरे झरझर गरून राह्यले व्हते .
' निधी , रडू नकोस... अगं किती समंजस आहे तू... नेहमी तूच मला सांभाळून घेतलं , जपलं , समजावलं... माझी जिवलग आहेस तू आणि राहशील ... अगदी मृत्यूपर्यंत ! ' परभ्यानं निधीचे आसू पुसत पह्यल्या डाव आपलं मन उघडं केलं .
परभ्याच्या तोंडावर बोट ठिवत नजरनच दटावलं तिनं . येकमेकाच्या खांद्यावर डोकसं ठिवून दोघं बी लडले पोटभरून ... दोघायचे बी खांदे वलेचिप झालते आसवायच्या गंगा यमुनानं ! वल्या गरम सासानं पिघरून गेले थे येकमेकात . दोघायनं बी जिंदगी भर संगंमंगं राहाची आन घेतली .
परभ्या पुस्तकं - सामान सुमान काहाडून निधीजवर देत व्हता आन् निधी खोख्यात , ब्यागमंदी बराबर भरत व्हती . आता सिरफ कपडेच भराचे राह्यले व्हते .
निधीले घरून फोन आला .
' प्रभाकर , मला जायला हवे . आईचा फोन आहे . आणि हो.. तुझ्यासाठी ही छोटीशी भेट .' निधीनं परभ्याले हातघडी देत मनलं .
' तूच घालून दे आता...' परभ्यानं मनलं .
' तू पण ना...' निधीनं लाडानं रागावून मनलं .
' Thank you.... थांब , तुझ्यासाठी पण एक भेटवस्तू आहे...' परभ्यानं पेंडट नेकलेस निधीले देत मनलं .
' अहं... हे तूच घालून द्यायला हवे...' निधीनं मनलं .
परभ्यानं निधीले आरस्यापुढं नेलं , आन् नेकलेस घालून देल्ला .
' Thank you... चल येते मी... बाय..' निधीनं मनलं .
' Welcome ...' परभ्यानं मनलं .
परभ्या गेट पावतर निधीले सोडाले आला .
कायी येरानं परभ्याचे दाआजी आले . दोघं बी क्यांटीनमंदी जेवले . परभ्यानं कपड्याची ब्याग भरली .
बसमंदी परभ्या रातभर झोपला नायी . याडमिसन पासून आजपावतरचे येकेक दिवस त्याच्या डोकस्यात घुमून राह्यले व्हते , थो मनानं अजून बी अवरंगाबादमंदीच व्हता .
दुपारी थे गावाले आले . इस्ट्यांडवर गडी ब्यागा घ्यासाठी आलता . आवारात सेजार - पाजारच्या बाया बसल्या व्हत्या . माय त दाठ्ठ्यातच उभी व्हती .
परभ्या आन् दाआजीनं आंग धुतलं न जेवाले बसले .
' पोरगं थकलं हाय .. आराम करू द्या त्याले .' दाआजीनं हात धूत मनलं .
परभ्या झोपला त येकदम दिवाबत्तीच्या येरलेच उठला . सद्या न वस्या पडवीत परभ्याच्याच उठाची वाट पाहात व्हते . जेवनयेर पावतर तिघायच्या गोस्टीमाताच चालू व्हत्या .
' जेवून घ्या रे पोर हो ...' मायनं आवाज देल्ला .
दोन - च्यार दिवस आराम करून परभ्या नाप्पूरले आला आन् इंटरनसिप चालू केली . ( क्रमशः )
लेखक : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment