Tuesday, July 20, 2021

दिंडी चालली पंढरी. varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

दिंडी चालली पंढरी
 Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

दिंडी चालली पंढरी
दरस्यनाले आतुर
दुमदुमली पांढरी
वारा सुवासे कापूर ।१।

परपंचाचे झमेले
आता राह्यले गा दूर
झाले येव्हारात येले
मांगं सरले काहूर ।२।

येड्या बांगड्याची सेवा
साधेसुधे गा दस्तुर
गोड मानून घे देवा
आला भरूनिया ऊर ।३।

तीर भिवरेचा लाल
सारे भजनात चूर
नभी अबीर गुलाल
तुका ग्यानबाचे सूर ।४।

माथा टेकू दे पायासी
रुनझुनु दे नुपूर
बोल बोल रे माह्यासी
मुक्या स्यबद नुपुर ।५।

भावभगतीचा पूर
मनामंदी हुरहुर
रूप गोजिरे इठूचे
काय वरनू मी नूर ।६।

रुंजगुंजते मनात
धुंद बासरीचे सूर
आमी जित्रब रानात
नादावतो चवखुर ।७।

हर हरी येकरूप
तालासुराचा तंबूर
रूप देवा अपरूक
काटे काढाया आंबूर ।८।

पुंडलिका पांडुरंगा
आभा गाभ्याची टिपूर
भुलवसी सीरीरंगा
रंग रंगाले फितूर ।९।

इठुमाई रखुमाई
जीवा सिवाचे गा धूर
मायमावली इठाई
नाम हिरद्या मधुर ।१०।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

6 comments: