Saturday, July 17, 2021

माह्या वावराची माती. varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

माह्या वावराची माती
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

तिच्या आंगोपांगी फुले
दादा अनाजाचे मोती
साऱ्या जगाले पोसते
माह्या वावराची माती ।१।

उन वाऱ्या पान्यामंदी
होये धडधड छाती
घास देये लेकराले
माह्या वावराची माती ।२।

बरसादीत लक्सुमी
मंग लंका पाराबती
उन सावलीत खेले
माह्या वावराची माती ।३।

तिच्या आंगचा सुगंध
दिवऱ्याची उदबत्ती
आस सासात रुजते
माह्या वावराची माती ।४।

मोठा हरीखे वावर
भाऊ पेरणीच्या घाती
लडे उघाड पडल्या
माह्या वावराची माती ।५।

पोट ज्याच्याच्यानं भरे
त्याची दूरदस्या किती
नाही डागेल डुगेल
माह्या वावराची माती ।६।

झिजे भागाच्या रेघोट्या
नाही खडकू बी हाती
भिजे घामा आसवानं
माह्या वावराची माती ।७।

किती पिढ्या जगवल्या
आता इझल्या गा वाती
बेइमानीनं लुटली
माह्या वावराची माती ।८।

साध्या वावराले भोये
बेपाऱ्याच्या कुरापती
किती फाकन फाकन
माह्या वावराची माती ।९।

तुमी गनिताचे पक्के
सुद्या मांगं साडेसाती
इठु मावलीचा गंध
माह्या वावराची माती ।१०।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

1 comment: