सरवा भाग - २०
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली
परभ्याच्या दाआजीनं गुरजीले फोन करून घरी बोलावलं व्हतं . गल्लीत गुरजीच्या फटफटीचा आवाज आला , तसाच परभ्यानं धावत जाऊन आवाराचा दरुजा उघडला .
' कसा आहेस प्रभाकर ? ' गुरजीनं परभ्याले इचारलं .
' बरा आहे.. ' असं मनत परभ्या सपरीत धावत आला .
दाआजी आन् गुरजी तखतपोसावर बसले . चा पानी झालं .
' अॅडमिशनचं काय ठरवलं ?' गुरजीनं पानपुड्यातून सोप घेत इचारलं .
' थे तुमीच पाहा गुरजी का कराचं हाये त.... ' दाआजीनं मनलं .
' आपल्याला नागपूरलाच प्रभाकरची अॅडमिशन करावी लागेल . काही क्लासची माहिती आहे माझेकडे . प्रभाकरची कागदपत्रे घेऊन जावे लागेल .' गुरजीनं येका दमात सांगतलं .
' तुमी मनान तसं ...' दाआजीनं मनलं .
' तुम्ही आणि प्रभाकर चला सोबत ... आता वेळ घालवण्यात अर्थ नाही .' गुरजीनं उठत मनलं .
' बरं... उद्याच निंगाचं का मग ? ' दाआजीनं पुसलं .
' हरकत नाही.. चला उद्या.. अच्छा येतो मी .' गुरजीनं मनलं न जोडा पायात सरकवला .
दाआजी आन् परभ्या गुरजीसंगं आवाराच्या दरुज्यापावतर आले . गुरजी गेले अन माय रान्नीतून सपरीत आली .
' बापू नाप्पूरात जाईन का सिकाले ?' मायनं पुसलं .
' हव.. गुरजीनं सांगतलं . सिकाले त पाठवाच लागन न .' दाआजीनं बंगयीवर बसत मनलं .
' बापू कसा राहीन त तिथं ?' मायनं परभ्याले जवर घेत इचारलं .
' तिथं पुरी येवस्था राह्यते.. तू टेंसन नको घिवू .' दाआजीनं समजावलं .
परभ्यानं नाप्पूरच्या कलासमंदी याडमिसन घेतली . कापसाचा चुकारा भेटला व्हता मून दाआजीचं निभलं , नायी त भलतीच तानापाजन झाली असती . कलासच्या होस्टेलमंदी राहून परभ्या सिकाले लागला . कलास अन होस्टेलमंदी येगयेगऱ्या गावचे पोरं - पोरी व्हते . दिवसभर कलास अन अभ्यास ! पाह्यता पाह्यता दोन वर्स कसे गेले , समजलच नायी . प्र्याकटिकल , टेस्टचा गुंताडा चालू व्हता . ह्या दोन वर्सात दिवारीपरता परभ्याले गावाले जाले भेटलं नायी . कलासमंदी मंदार ह्या परभ्याचा पक्का दोस्त झालता . दोघंयी संगच येकाच बेंचावर बसे . मंदार नाप्पूरचाच व्हता . परभ्या येक दोन डाव त्याच्या घरी बी गेलता .
' अरे प्रभाकर , इकडे ये..' कलास सुटल्यावर मंदारनं परभ्याले पारकिंगमंदी बलावलं .
' काय मंदार ?' परभ्यानं इचारलं .
' उद्या क्लास झाल्यावर तू माझ्यासोबत घरी चल . बाबांनी बोलावलं आहे .' मंदारनं सांगतलं .
' बरं.. सरांना विचारतो आधी .' परभ्यानं मनलं .
मंदारले घ्याले त्याची आई आलती . मंदार आईमांगं बसला आन् परभ्याले इस्यारा केला . परभ्या आंगोठा दाखवत हासला . परभ्यानं मंदारच्या घरी जा साठी सरले इचारलं . त्यायनं होकार देल्ला .
आज मंदारचे बाबा आलते कार घिवून .. मंदार आन् परभ्या कारमंदी बसले . मंदारच्या घरी पोचल्यावर त्याचा मोठाजात कुतरा त्याच्या जवर आला . मंदारनं लाड करत त्याले अंदर आनलं .
परभ्या आपली ब्याग मांडीवर ठिवून सोफ्याच्या येका कोनट्यात बसला . मंदारच्या आईनं नास्ता आनला . मंदारच्या बाबानं अभ्यासाची चवकसी केली . त्यायनं JEE संगच AME CET ची बी माहिती सांगतली . त्याच्यानं Aircraft maintenance Engineering , Aeronautical engineering , Aerospace engineering मंदी याडमिसन भेटते , असं सांगतलं . हे त परभ्याच्या आवडीचं व्हतं . मंदारच्या बाबानं परभ्याले होस्टेलमंदी सोडून देल्लं .
जेवन झाल्यावर परभ्यानं घरी फोन लावला ; दाआजी आन् मायसंगं बोल्ला . माय त निरा घरी याचाच नांदा लावत व्हती .
.. परभ्या सपनामंदी अगासात कुठं कुठं फिरुन रायला व्हता ..... वरतं खाली... इकडं तिकडं..... झोपंत यी त्याच्या चेहऱ्यावर हासू झलारून रायलं व्हतं.... ( क्रमशः )
लेखक : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment