पतंग
Marathi language _ मराठी भाषा
रंगीबेरंगी पतंगाची पाखरं
मुक्त विहरतात आकाशात
काळा , पांढरा , नारिंगी , हिरवा
लाल , गुलाबी , निळा , जांभळा
रंगात भेद ना कुठले !!!
बहुरंगा , दुरंगा , ढग्गा , खडा सब्बल
वरती मांजा खाली सद्दी..
चक्री गुंडाळण्यासाठी आणि
ढील देताना बनते पुरवठादार
बंध जोपासलेले !!
पेचा दिवसभर परंतु
जीवनातील पेच कन्नी कापलेले !!
मुक्त आभाळ पतंगासाठी
विचार , अस्मिता , मालकीच्या
सीमा नसलेले !!
सरसर वर जाऊन कापतो पतंग
ओ काट ऽऽ ओ पार ऽऽ चा
जल्लोष निनादतो...
कापलेला पतंग गिरक्या घेत येतो
_ अनाथासारखा..
लुटणारे हात आधीच तयार
आसुसलेले !!
फाटलेला - लुटलेला पतंग
अनुभवतो घट्ट पकड
भिरभिरती संध्याकाळ
एकेक पतंग उतरतो खाली
बोटं रक्ताळलेली पण _
मनात आनंद आभाळाएवढा !!
रंगाचा , वयाचा , गच्चीच्या उंचीचा
बेभान मनाचा , आभाळाच्या मायेचा
भेदभाव नसतोच मुळी
ओ काट ऽऽ ओ पार ऽऽ
कुणाला चढवत नसतो सुळी ....
रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment