निचरा
Marathi language _ मराठी भाषा
मानवी मन अतिशय गुंतागुंतीचं , अनाकलनीय व क्लिष्ट आहे . हे अनंत रंगी रत्न जसं मोहक तसंच जीवघेणं !
कालानुरूप ह्या रत्नाला पैलू पडत जातात .
मनाला प्रतिस्पर्धी मती . ह्या दोहोंच्या संतुलनाने सगळे सुरळीत चालू शकते _ पण , असे होत नाही . जसजसा काळ पुढे सरकतो तसे मन व मती ह्यांची तीव्रता वृध्दिंगत होत जाते .
आजच्या परिस्थितीचा विचार केला तर आदिम अवस्थेनंतर आपण बराच पल्ला गाठलेला आहे . जीवनाची गुंतागुंत वाढली आहे . साधं , सरळ नैसर्गिक जीवन संपलेलं आहे व प्रगत विज्ञानाचा आरामदायी जीवनासाठी वापर करताना ' यांत्रिकपणाची ' लागण झालेली आहे . हा बदल काही दिवसांचाच वा सहेतुक नसतो , प्रत्यक्ष करवून घेतलेलाही नसतो तर अप्रत्यक्षपणे व अव्याहत चालू असतो . काळाची कक्षा जशी रुंदावत जाते , तसा मन व बुध्दीवर ताण पडत जातो . अद्यावत साधनांमुळे जग जसजसे जवळ येत आहे , तसतसे पृथ्वीविषयीचे कुतूहल शमत आहे... व आपली साधने आणि जिज्ञासा पृथ्वीच्या कक्षेबाहेर झेपावत आहे . _ परंतु येथेच मेख आहे !! ह्या संक्रमणावस्थेत ना आपण पृथ्वीशी एकनिष्ठ आहोत ना अज्ञाताशी जवळीक आहे .
एक टाचभर राहिलेल्या धरणीला व्यापायला करोडो वामन आतुर आहेत . कमालीची यांत्रिकता व कुठलेही विधी निषेध नसणारे प्रतिस्पर्धात्मक जीवन , ह्यात मन व बुद्धीचे संतुलन नकळत बिघडून गेले . पावलोगणिक तडजोडी स्विकारताना अक्राळविक्राळ प्रवाहात ' स्वत्व ' तगवताना अतिशय हीन पातळी गाठावी लागते . नैसर्गिक भावनांचा असह्य कोंडमारा होतो . जीवनशैली बदलल्यामुळे घराच्या कल्पना व आकांक्षा बदलतात . आत्मकेंद्री वृत्ती वाढत जाते .
स्वतः ला तगवायला व स्थापित करायला जेवढी असंगत कृत्ये व पापे करावी लागतात , तेवढीच ' स्व ' ची तीव्रता समाजाला असहनीय व असमर्थनीय ठरते . ह्या सगळ्यांचा परिपाक म्हणजे वैयक्तिक असंतोषाचे पृथ्वीनाशक - जीवन नाशक उद्रेक !!!
_ आणि अशा असंख्य उद्रेकाची अनंत मालिका तयार होते . मनाचा कप्पा कोरडा राहतो व विकृत बुध्दी अशांत होते .
वठलेल्या वृक्षावर प्लास्टिकची पाने फुले सजवून त्याचा असण्याचा भास आपण निर्माण करतो , पण _ वृक्षाच्या कोमल अव्यक्त भावना , पानांची तरल सळसळ , पाखरांचा मंजुळ कलरव , ऋतूमाजी आगळंपण व जीवंतपणा ह्या अति नैसर्गिक गोष्टी आपण उभारू शकत नाही . आपलं प्रगतीफळ असं वठलेल्या पण सजवलेल्या वृक्षाप्रमाणे !!
प्रगतीबरोबर आपल्याला लाभलेल्या ह्या असंतोषाच्या उद्रेकाचा आणि अतिमहत्त्वाकांक्षेचा निचरा कसा करायचा ?
_ जेणेकरून आपली नैसर्गिकता व पृथ्वी टिकून राहील ....
मन व मती ह्यांचा समतोल कसा साधायचा ??
लेखक : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
No comments:
Post a Comment