Wednesday, April 6, 2022

सरवा - भाग २८. ‌. varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

सरवा - भाग २८
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

परभ्यानं आय.टी. पार्क जवरच रूम केलती . साहा मह्यने भरकन् सरले . परभ्या अवरंगाबादले कालेजमंदी गेला . सारे सोबती भेटले . निधी आन् कनक बी आलती . पूरा दिवस धांधलीत गेला .परभ्या आन् सुनील रातरी हटेलात थांबले . रातभर दोघायच्या गोस्टीमाता चालू व्हत्या . परभ्याची नाप्पूरच्या TCS कंपनीत आन् सुनीलची मुंबईच्या येका कंपनीत मुलाखत झालती . दोघायचं बी कप्प्यावानीच व्हतं , पन येक डाव अजून फायनल सिलेक्सन आन् बोलनं करासाठी जावाचं व्हतं . 
दुसऱ्या दिवसी दोघं बी कालेजात आले . निधी आन् कनक बी आली . कालेजचं उरलं सुरलं काम निपटवून चवघं यी क्यानटीन मंदी आले . निधीचं अवरंगाबादच्याच येका कंपनीत फायनल झालतं . चवघं यी गुपचाप बसले व्हते . निधी गऱ्यातल्या पेंडटसंगं खेलून रायली व्हती . परभ्यानं लस्सीची आरडर देल्ली . 
' निधी.... काही बोलणार आहे की नाही !' परभ्यानं निधीकडं पाहात मनलं . 
' लवकर चला रे.... आई बाबा वाट बघत आहे .' निधीनं खोट्या तावानं मनलं . 
लस्सी आली . परभ्यानं गटागट पेली आन् काउंटरवर पयसे द्या साठी गेला . 
निधीची स्कुटी परभ्यानं घेतली . चवघं यी निधीच्या घरी आले . 
' हातपाय धुवून घ्या आणि डायनिंग टेबलवर बसा .' निधीच्या मायनं मनलं . 
निधीच्या बाबानं इचारपूस केली . सुनीलले लवकर जा चं व्हतं . थो जेवन करून क्याबनं गेला . परभ्याची गाडी रातच्याले व्हती . 
' आम्ही कनककडे जाऊन येऊ काय ? ' निधीनं बाबाले पुसलं . 
' ठीक आहे पण संध्याकाळी लवकर या . प्रभाकर येथेच जेवण करून जाईल . ' निधीच्या बाबानं मनलं . 
तीघं यी घरुन निंगाले . निधी येका मॉल जवर थांबली . 
' येथे कसले काम आहे ?' परभ्यानं इचारलं . 
होठावर बोट ठिवत निधीनं इसारा केला न स्कुटी स्ट्यांडवर लावली . तीघंयी मॉलमंदी आले . निधी पुढं आन् मांगं मांगं परभ्या न कनक ! 
निधीनं दोन प्यांटं आन् दोन मनिले काहाडले . 
' हे घालून दाखव बरं ..' निधीनं परभ्याले चेंजिंग रूम कडं नेत मनलं . 
' अग , पण कशाला ?' परभ्यानं मनलं . 
' मी म्हणते म्हणून ! समजलं...' निधीनं त्याले चेंजिंग रूम मंदी धकावत मनलं . 
निधी पुढं परभ्याचा कायी इलाज नोता . 
' अरे किती वेळ लागेल ! ' निधी बाह्यरुनच कातावली . 
' आलो बाबा...' परभ्यानं बाहिर येत मनलं . 
' खूप छान दिसताहेत... फिटिंग तर परफेक्ट ! ' निधीनं परभ्याकडं पाहात मनलं . 
मंग परभ्यानं बी तिले दोन प्यांटं आन् दोन टाप दाखवले . निधी कां कू कराले लागली . 
' तू घेणार नसशील तर मी पण घेणार नाही .' परभ्यानं जाहीर केलं . 
निधीचा उपावच हारपला . तिनं कोपरापासून दोनी हात जोडले आन् कपडे घेतले . 
तिथून थे कनकच्या घरी गेले . कायी येरानं निधी आन् परभ्या वापिस घराकडं निंगाले . 
' निधी... ' परभ्यानं स्कुटी चालवत मनलं . 
' काय रे...' निधीनं त्याच्या खांद्यावर हनुटी ठिवत मनलं . 
' कधी एकत्र राहू ग आपण ? ' परभ्यानं इचारलं . 
' लग्नानंतर... आणि हे तुला पण माहिती आहे . ...' निधीनं मनलं . 
' practically बघितलं तर अजून ६ वर्ष तरी नक्कीच ! मला GATE clear करून m.tech करायचे आहे . ह्यात ३ वर्ष लागतीलच . नंतर करिअर.....' परभ्या सांगत व्हता . 
' बघ , तुझे calculations तुझ्या हिशेबी ठीक आहे.. मला फार तर ३ ते ४ वर्षांची वेळ आहे . ह्यात माझे m.tech पण पूर्ण होईल . परंतु करिअरसाठी आई बाबा मला जास्त अवधी देईल , असे वाटत नाही..' निधीनं मनलं . 
' जास्त तडजोड करावी लागेल , असे वाटत नाही . सगळं काही व्यवस्थित होईल ...' परभ्यानं निधीच्या गालावर थापटत मनलं . 
बोलता बोलता थे घरी आले . 
निधीच्या मायनं परभ्याले गरम गरम वाढलं . परभ्याचा घास कायी नड्ड्याखाली जात नोता . थो कसा तरी पान्याचे घोट घेत घेत जेवला . 
परभ्या निधीच्या बाबाचे पाय लागासाठी वाकला . 
' आम्हाला विसरणार तर नाहीस प्रभाकर ?' परभ्याचा डब्बा घिवून उभी निधीच्या मायनं मनलं . 
परभ्याचा गरा दाटून आला न डोऱ्यातून टचकन पानी आलं . 
' खूप हळवा मुलगा आहे...' निधीच्या बाबानं परभ्याच्या डोऱ्यातलं पानी पाहून मनलं . 
परभ्याले लडतानी पाहून निधीचे डोरे यी आपरंगच गराले लागले . आपले आसू लपवून निधी अंदर गेली . 
निधीच्या बाबानं परभ्याले सोडून द्या साठी कार काहाडली..... ( क्रमशः ) 

लेखक : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

No comments:

Post a Comment