Friday, April 30, 2021

नाही घामाले किंमत ( वऱ्हाडी कविता ). varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

नाही घामाले किंमत
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली

नाही घामाले किंमत
सारी बाबूगीरी चाले
गेल्या खपाटी पोटाले
टोचे मतलबी भाले ।१।

नाही घामाले किंमत
हात मातीतच वले 
पाह्ये करमाच्या किरा
जिनगानी भर येले ।२।

नाही घामाले किंमत
जग त्याच्यानच चाले 
पेते रगत पिसवा
झ्यंडा त्यायचाच हाले ।३।

नाही घामाले किंमत
सारे खोट्याचेच चेले
नेत्या बेपाऱ्याचं राज
हवा पानी बी इकले ।४।

नाही घामाले किंमत
किती पाखंडी बगले
आव सावाचा आनून
नड्ड्यालेच चिपकले ।५।

नाही घामाले किंमत
तन कस्टाचे येचले
नाही निसवलं सुख
गरभच नासवले ।६।

नाही घामाले किंमत
राजा बोले दल हाले
उभी रयत उपासी
देते टोल्यावर टोले ।७।

नाही घामाले किंमत
आड आसचे सुकले
कोड्ड्या पोह्यऱ्याचे नड्डे 
ठेंबासाठी तरसले ।८।

नाही घामाले किंमत
जिते मरनात गेले
डाग स्याईचे बोटाले
संगं सरनात गेले ।९।

नाही घामाले किंमत
किती रगत आटले
भाकरीच्या सपनाचे 
गाव चुलीत पेटले ।१०।

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

2 comments: