सरवा - भाग २३
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली
परभ्याचा निकाल आला . परभ्या नाप्पूरले मंदारच्या घरी आला . मंदारले aerospace engineering कराचं व्हतं , पन् परभ्याचा कायी इचार पक्का नोता . दोघाय न बी फारम भरले . मंग याडमिसनचे राऊंड चालू झाले . मंदारचा बंगलोरच्या कालेजमंदी नंबर लागला . बंगलोरले मंदारची बहिन बी राहात व्हती . मंदारच्या बाबाचं लय टेंसन दूर झालं . परभ्याचा काम्पुटर सायन्स यांड इंजिनियरिंग साठी अवरंगाबादले नंबर लागला .
अवकाली पान्यानं संतऱ्याचं भायीच नुकसान झालतं . हातातोंडी आलला घास पान्याच्यानं गेला . परभ्याच्या दाआजीचा भरोसा संतऱ्यावरच व्हता . उनारी भुईमूंग त डुकरायनं पार उखरुन टाकली व्हती , रोह्यायचा तरास त येगराच . याडमिसन तवरुतच कराची व्हती . परभ्याच्या दाआजीचे क्राप लोनचे पैसे ब्यांकत जमा व्हते . आता थे परभ्या नावाच्या नव्या पीकासाठी लागनार व्हते . परभ्याच्या दाआजीनं थे पैसे काहाडले .
परभ्या तसा कायी लय हिंडला नोता . वरधा , नाप्पूर , उमरावती , मोझरी , माहूर , सेगाव , सालबड्डी , पारडसिंगा पावतरच त्याची धाव व्हती . त्याच्या हिसोबानं अवरंगाबाद लय दूर व्हतं .
परभ्यानं रेलवेच्या टिकिटा काहाडल्या , नंदीग्राम येक्सप्रेसच्या . तारखीवर परभ्या आन् दाआजी नाप्पूरले आले . मंदारच्या घरी फटफटी ठिवली . मंदारच्या बाबानं दोघायले रेलवे ठेसनावर सोडलं . गाडी अवरंगाबादले आली तवा रात झालती . थे हटेलात थांबले . सकारीच च्या - नास्ता करून आटोनं कालेजात गेले . लय मोठ्ठं कालेज व्हतं . परभ्याले त सारं नवाडं नवाडं वाटून रायलं व्हतं . पुरा दिवस कालेजात गेला . याडमिसन झालती .
' आता च्यार वर्स तुले हिथंच सिकाचं हाये बापू .' दाआजीनं मनलं.
' हव...' परभ्यानं मनलं.
दोघं बी रेलवे ठेसनावर आले . परभ्या भुकीजून गेलता . ठेसनातल्या हटेलात दोघं बी जेवले आन् गाडीची वाट पाहाले लागले . परभ्याले झोपंची गुंगी आली . दाआजीच्या मांडीवर डोकसं ठिऊन थो निजला . दाआजीनं त्याले थोपटत त्याच्याकडं पाह्यलं . लहानस्या पोरासारखा परभ्या बिनघोर निजला व्हता . पापनीआडून त्याच्या डोऱ्याचे बुबुरं फिरत हाये , असा भास दाआजीले झाला .
' पोरगं सपान पाह्यत असन बटं ! ' दाआजीनं मनातच मनलं .
त्यायनं यी परभ्यासाठी लय सपान पाह्यले व्हते . कास्तकाराच्या जिनगानीत लय हाल हाये . आपल्या पोरानं लय सिकावं , नाव कमावावं , असी त्यायची इच्छा व्हती . परभ्या तसा यी लेहन्या - वाचन्यात खूब हुस्यार व्हता . त्याले सिकस्यनाची भारीच आवड व्हती . पुऱ्या तह्यसिलीत त्याचं नाव व्हतं . त्याची हुस्यारी वाया नायी गेली पायजेन , असं त्यायले वाटे . लाडा - कवतिकाचा , येकुलता येक जीवाचा तुकडा आता मोठा झालता . त्याच्या पखाचं अगास येगरं व्हतं ..... त्याची दुनियाच नवखी व्हती . आतापावतर कोचोड्यात राह्यलेल्या पाखरासाठी आता सारी दुनिया खुली व्हती .... त्याची झेप आपल्यापासून दूरवर जाईन... थो आपल्यापासून दूर व्हयीन . ... ह्या विचारानं त्यायचा हिरदा भरून आला . आपरंगच डोरे झराले लागले . त्यायचा आसू नेमका परभ्याच्या गालावर पडला . दाआजीनं दुपट्यानं थो पुसला आन् परभ्याची झोप उघडली .
' किती येर हाये जी ?' उठून बसत , डोरे पुसत परभ्यानं इचारलं .
' येईनच बापू आता . ' दाआजीनं मोबाइलवर गाडीचं स्टेटस् पाहात मनलं .
' तुमाले बी झोप येत हाये का ?' जांभोरी देनाऱ्या दाआजीकडं पाहात परभ्यानं इचारलं .
' नायी , तू बसतं का उलिसा , मी हातपाय मोकरे करून येतो .' परभ्याच्या दाआजीनं कंबर मोडत मनलं .
' ठीक हाये... या तुमी , मी बसतो हिथंच .' परभ्यानं दाआजीजवरचा मोबाइल घेत मनलं .
दाआजी प्ल्याटफारमवर फिराले लागले . परभ्या त्यायच्यावर लक्स्यं ठिवून व्हता . दाढी पिकली व्हती दाआजीची ! उनानं त्यायचा चेहरा बी कारपटला व्हता .. लय चिंता करते त्याचे ढगं त नोते थे ! रातदिस निरी दगदग ... घडीभर यी आराम नायी . दिसाले पैलवान पन मनानं लय सकवार . त्यायनं कंदी बी परभ्यावर हात उचलला नोता , पर त्याले भेव त लागेच ! परभ्या आपल्याच गुंताड्यात व्हता . उलिसी नजर हटली त् त्याले दाआजी कायी दिसले नायी . थो भेबारुन गेला .
' कुठं गेले असन ?' परभ्यानं सोतालेच इचारलं .
भेव अन् चिंतेची इज त्याच्या छात्यात चमकली . आता पावतर त हिथंच फिरत व्हते ... गाडी येईपावतर नायी आले त कसं कराचं ??... त्याले जाग्यावरून यी उठता येत नोतं . आपन इकडं तिकडं गेलो न दाआजी इकडं आले त मी दिसनार नायी . चारी आंगं मान फिरवू फिरवू परभ्या जवरपासून दूरपावतर पाहाले लागला . भेवाच्या लाटावर लाटा त्याच्या डोकस्यात न मनात फुटत व्हत्या . भेवानं त्याले घाम फुटाले लागला अन् पापनीवर आसवाचे पाखरं बसाले लागले . पोटातून येक गोला त्याच्या छातीपावतर आला न त्याले हुंदका फुटला . आतापावतर त्याच्या पापनीवर बसलेले पाखरं भूर्रकन उडाले न आसवाची गंगा जमुना वाहाले लागली . सारा प्ल्याटफारम त्याले अंधुक अंधुक दिसाले लागला . चालनारे बायामानसं , बोलनारे पोरं पोरी , चिल्लावनारे हमाल , बोंबलनारे च्या वाले हे सारे त्याले वाटरकलरच्या चितरंगासारखे , पान्यात वाह्यत्या रंगासारखे दिसाले लागले . येक मोठी सावली त्याच्यापुढं आली .
' कायले लडून रायला रे बापू ? ' थ्या सावलीकडून आवाज आला .
येक पांढरा कपडा त्याच्या डोऱ्यावरून फिरला न नाकपुड्या त्याच्या चिमटीत गेल्या . दाआजी पुढं उभे व्हते . थो पटकन उठला तसं दाआजीनं त्याले छातीसीन पकडलं .
' का झालं ? ' दाआजीनं त्याच्या डोकस्यावरून हात फिरवत इचारलं .
' तुमी कुठं गेलते ?' परभ्यानं दुपट्यानं आसू पुसत इचारलं .
' अरे हिथंच व्हतो . जरासा लघवी कराले गेलतो . मी दिसलो नायी मून तू भेबारला का ? ' परभ्याले बसवत दाआजीनं मनलं .
' नायी त का ... तुमी सांगतलं बी नायी . ...' परभ्यानं नाराजीनं मनलं .
' चुकलं माह्यं... बरं.. पन् येक लकस्यात ठिव , मी कुठं बी असलो तरी माह्यं पुरं ध्यान तुह्याकडच राह्यते . तुह्यातच जीव हाये रे बापू आमचा ! आपलं इन मीन तीन झनाचं घर पर जीव त् येकच हाये नं . आयुकस्यात भेवाचं नायी कंदी बी .... मी दिसलो नायी तरी तुह्या सावलीत मीच हावो.... तुह्या चारीआंग मीच हावो , हा भरोसा ठिवाचा . मायबापाचा जीव कंदी बी पोरायपासून दूर ऱ्हात नायी बटा . घे , पानी पे .' ब्यागंतून पान्याची बाटल काढून परभ्याले देत दाआजीनं मनलं .
' आपन दोघं इकडं हावो , तिकडं घरी तुह्यी माय जेवली नसन . तू नाप्पूरले व्हता तवा तिले तुही आठवन आली क तिचा घास घेतला हात थिजून जाये... थांबून जाये . बस तिथंच जेवन आटपे तिचं ! तिले लय समजावो ... पन् थे तुह्यी माय व्हय ... आयकन् थोडीच . खान्यापेन्याकडं ध्यान द्यावं मानसानं . जोवर कुडी तवर देवाजीची गुडगुडी... मंग जगबुडी ! ' दाआजीनं परभ्याले समजावत मनलं .
परभ्या अन् दाआजी घरी आले . माय वाटच पाहात व्हती .
' आंगपाय धुवा पटकन ... मी गरम गरम जेवनच वाढतो . ' मायनं इजच्या फुरताईनं कामं आवरत मनलं .
रान्नीत मायनं पाटं लावले.. ताटं वाढले . वरनभात , भाजी , पोई सारं गरमागरम ! वरून मायच्या हाताले चवच मोठी साजरी .
' माय , तू रातरी जेवली व्हती का ?' परभ्यानं पाटावर बसत इचारलं .
दाआजी जेवाले लागले.
' असा काऊन इचारतं बापू ?' मायनं पोई सेकता सेकता मनलं .
' पह्यले सांग त् .' परभ्यानं मनलं .
' तुमी जेवा पह्यले गरम गरम .' मायनं दाआजीले पोई वाढत मनलं .
' सांग न पह्यले .' परभ्यानं हठ करत मनलं .
' तुमी जेवले क पोट भरते माह्यं . .... जेवनं बापू .' मायनं दाआजीले वरन , भाजी वाढत मनलं .
परभ्यानं उठून आपला पाट आन् ताट मायजवर मांडला . पोईभाजीचा घास परभ्यानं माय पुढं धरला .
' तू घे पह्यले.' परभ्यानं मनलं .
' सयपाक करता करता जेवते का कोनी बापू ? ' मायनं पोई वाढत मनलं .
' थे मले माहीत नायी .. तू घे पह्यले .' परभ्यानं मनलं .
दाआजी गपचूप भरंभरं जेवले .
' बरं तुमचं मायलेकाचं चालू द्या... मी येतो वावरातून .' दाआजीनं हासतच हात धुवत मनलं .
' तुमी पोटभर नायी जेवले का जी ? ' मायनं इचारलं .
' मी जेवलो पोटभरून ... तुमी दोघं बी जिऊन घ्या बरं आता .' दाआजीनं सपरीत जात मनलं .
दाआजीच्या फटफटीचा आवाज आवारात घुमला . मायनं तावा उचलून ठिवला न हात धुतले . मायनं पाट घेतला न परभ्याजवर बसली .
' असं नायी कराव लेकरा .... चाल जेव आता .' मायनं परभ्याले घास भरवत मनलं .
परभ्यानं यी मायले घास भरवला ... मायलेक संगच जेवले .
' झाली का रे बापू याडमिसन ? ' मायनं इचारलं .
' हव झाली न . ' परभ्यानं सांगतलं .
' किती वर्स लागन रे बापू ? ' मायनं इचारलं .
' च्यार वर्साचं हाये . मंग पुढं सिकीन थे येगरं .' परभ्यानं सांगतलं .
मायनं त्याचा चेहरा सेवानं पुसला न त्याच्या कपाराचा मुका घेतला .
' अयऽ.... बापू हाय का ?' सद्याचा आवाज आला .
सद्या अन् वस्याची जोडी हाजर झालती.... ( क्रमशः )
लेखक : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
लय मस्त लिव्हल भाऊ
ReplyDeleteधन्यवाद विरु भाऊ
Delete