Wednesday, December 23, 2020

अजब गजब - ४५ अ : मन्नाथेश्वर मंदिर , घोगरा. Marathi language _ मराठी भाषा

अजब गजब - ४५ : मन्नाथेश्वर मंदिर , घोगरा
Marathi language _ मराठी भाषा 

महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यातील नरखेड तहसील मध्ये कारंजा - भारसिंगी रोडवर सावंगा गावापुढे घोगरा हे गाव आहे . घोगरा गावापासून डाव्या बाजूला १.५ कि.मी. अंतरावर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मन्नाथगड आहे . 
मी आणि मनोज भाऊ गोरे प्राचिन मन्नाथेश्वर तीर्थक्षेत्र दर्शनासाठी नागपूरहून निघालो . लोहारी सावंगा वरून विक्की बन्नगरे ही सोबत आले . योगायोगाने त्याच दिवशी ' मन्नाथेश्वर मंदिर उत्सव कमिटी ' ची मन्नाथगडला सभा होती . सभेमध्ये कमेटी अध्यक्ष सुधाकर भाऊ घागरे , सचिव रामनाथ गोरे , वसंतराव चापले , डॉ संजय ढोकणे , सुरेश पठाडे , नरेश मानमोडे , डॉ प्रमोद गोरे , पंकज खवशी , उत्तमराव पेठे , सुरेश कुमेरीया , पुंजाराम मुरोडीया असे वीसेक जण होते . सभेमध्ये सर्वांचा परिचय करून देण्यात आला . माझा येथे येण्याचा उद्देश सांगितला गेला . मी लिहिलेले " भोयरी मराठी शब्दकोश आणि भाषा विज्ञान " हे पुस्तक कमेटीला सप्रेम भेट दिले . सर्वांशी ओळख झाली . कमेटीने मन्नाथेश्वर ची महिमा आणि माहिती सांगितली . 
घोगरा गावावरून मन्नाथगड ला जाण्यासाठी वळण व घाटाची डांबरी सडक आहे . मन्नाथगड ही परिसरातील सर्वात उंच जागा ! तेथून पंधरा गावांचे शिवार दिसते . मन्नाथगडला तीर्थक्षेत्राचा शासकीय दर्जा मिळाला आहे . मन्नाथेश्वर मंदिर भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाच्या अखत्यारित येतो . त्यांनी माहिती फलक लाऊन आपली जबाबदारी पूर्ण केली आहे ! 
हे तीर्थक्षेत्र रामायण काळापासून प्रसिद्ध आहे . येथील मन्नाथेश्वर शंकराचे हेमाडपंथी देऊळ तर अप्रतिम ! 

१ . इतिहास आणि मान्यता : * हिंदू धर्मातील हठयोगावर आधारित नाथ संप्रदाय भगवान भोलेनाथ ला सर्वस्व मानणारा पंथ ! हजारो वर्षांपासून भारतातच नव्हे तर मक्का मदिना , अफगाणिस्तान , पाकिस्तान , श्रीलंका , नेपाळ , तिबेट , बांगलादेश , ब्रह्मदेश , थायलंड , व्हियतनाम , कंबोडिया पर्यंत भगवान महादेवाचा डंका नाथपंथाने वाजविला आणि भगवान शिवाच्या उपासनेला आणि परंपरेला खऱ्या अर्थाने पुढे नेले . आदिनाथ भगवान शंकरजी नाथपंथाचे प्रथम गुरू . नवनाथाच्या परंपरेत ८४ महासिध्द गुरू झाले . गुरू मत्सेंद्रनाथ यांना नाथ संप्रदायाचे संस्थापक मानतात . त्यांची समाधी उज्जैन येथील गढकालिका माता मंदिर आणि भर्तुहरी गुफेजवळ आहे . गुरू गोरक्षनाथ यांनी नाथ संप्रदायाची व्यवस्थित घडी बसवून जगभर प्रचार आणि प्रसार केला . गुरू मत्सेंद्रनाथ ह्यांनाच मछिंदरनाथ , मच्छिंद्रनाथ , मचिंद्रनाथ आणि ' मीननाथ ' ह्या नावांनी सुध्दा ओळखले जाते . गुरू मत्सेंद्रनाथांनी येथे तपश्चर्या केली होती . त्यांच्या नावावरूनच ह्या गडाला ' मन्नाथगड ' आणि येथील भगवान शिवशंकराला ' मन्नाथेश्वर ' असे नाव पडले , असे म्हणतात . 
* मन्नाथेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला एक नवीन देऊळ दिसते . ह्याची पण कथा अजब गजबच आहे . हे देऊळ रामदास महाराजांच्या कारकीर्दीत बांधले आहे . ह्या देवळात त्रिकोणी आकाराची शिळा आहे , हीच मन्नाथबाबा ( गुरू मत्सेंद्रनाथ ) यांची मूर्ती ! हे देऊळ बांधण्याआधी येथे घोगलीचे झाड होते आणि त्याखालीच ही मन्नाथबाबांची मूर्ती होती . मन्नाथबाबा नवसाला पावतात , असी श्रद्धा आहे . तेव्हा संततीप्राप्तीसाठी लोकं घोगलीच्या झाडाला लाल कपड्याची चिंधी / ध्वजा बांधून नवस करायचे / बोलायचे . 
* येथील ज्येष्ठ मंडळी सांगतात की , आधी मन्नाथबाबा त्रिकोणी आकारातच होते . आता त्या मूर्तीला नाक , कान , डोळे , तोंड असे अवयव दिसू लागले आहेत ... मन्नाथबाबाची महिमा अगाध आहे . 
* प्रभू श्रीराम , सीता माता आणि लक्ष्मण जी वनवासात असताना त्र्यंबकेश्वर नाशिक येथून मोझरीच्या दासटेकडी वर आले होते . तेथून ते मन्नाथगडला आले आणि येथे काही काळ वास्तव्य केले . नंतर मन्नाथगडहून रामटेककडे प्रस्थान केले , अशी मान्यता आहे . 
मन्नाथगडाच्या पायथ्याला आता पण ' सीता न्हाणी ' आहे . काळ्या कातळांनी बांधलेला हा कुंड येथील एक  तीर्थक्षेत्र आहे . प्रभू रामचंद्र , सीता माता आणि लक्ष्मणाच्या पदस्पर्शाने मन्नाथगड क्षेत्र पावन झाले आहे . 
प्रभू रामचंद्रांनीच मन्नाथगड येथे शिवशंकराची स्थापना करून पूजा अर्चना केली , अशी श्रद्धा आहे . 

* मन्नाथेश्वर मंदिराच्या परिसरात आताही एक घोगलीचे झाड आहे . मन्नाथगडच्या पायथ्याशी असलेल्या गावाचे नाव ही घोगरा आहे . पूर्वी ह्या परिसरात घोगलीची खूप झाडे होती , म्हणून गावाचे नाव घोगरा पडले , असी ही एक दंतकथा आहे .
* आपल्या देशात गुप्त राजांच्या काळापासून ( इ.स. ३२० - ५५० ) मंदिरांचे बांधकाम व्हायला लागले . 
* देवगिरीच्या यादव राजांच्या काळात इ.स. १३५९ पासून इ.स. १२७४ पर्यंत हेमाद्री उर्फ हेमाडपंत हे या राज्याचे पंतप्रधान होते . यादव राजा महादेव ( इ.स. १२६२ - १२७० ) आणि राजा रामदेव राव ( इ.स. १२७१ - १३११ ) ह्यांच्या कारगिर्दीत हेमाडपंतांनी शिवशंकराची खूप मंदिरे बांधली . त्यांच्या आधी पण इ.स. ११०० - १२५० ह्या कालखंडात अशीच मंदिरे बांधली गेली . ह्या कालखंडातील देवळाच्या बांधकामात जास्त नक्षीकाम असायचे . यादवकाळात नक्षीकाम कमी झाले परंतु देवळांची संख्या खूप वाढली . आणि ही वास्तु परंपरा मराठा राजवटीत इ.स. १८०० पर्यंत राहाली . 
* हेमाडपंथी मंदिराची वास्तुकला माळव्यातील भूमीज मंदिर कला ( राजा भोज - समरांगण सूत्रधार ) आणि नागर ( इंडो आर्यन ) मंदिर शैलीच्या मिश्रणातून विकसित झाली . हेमाडपंथी मंदिर बांधणीचे आपले एक वैशिष्ट्य आहे . ह्यामध्ये काळ्या पाषाणी किंवा वालुकाश्म दगडांचा वापर केला जातो . शिलाखंडांच्या बांधकामात चुना ,  गारा किंवा सिमेंट सदृश्य  मसाला ह्यांचा वापर नसतो . हे बांधकाम कोरडे असते . बांधकामाच्या गरजेनुसार चौकोनी , त्रिकोणी , लांब , आखुड असे दगड घडविले जातात . शिलाखंडाच्या पकडीसाठी दगडातच खोबण , खाच , खुंटी बनवितात . स्तंभ एकाच शिलाखंडात घडवितात . स्तंभ चौकोनी , षट्कोनी , अष्टकोनी असतात . मधल्या पट्ट्यात निरनिराळ्या मूर्ती , वेल फुलांची नक्षी , भौमितिक आकृत्या असतात . छताच्या कोपऱ्यापासून शिळाखंड रचून अगदी मध्यभागी कमळाच्या फुलाची किंवा झुंबराची नक्षी असलेला चौकोनी शिलाखंड ठेवतात . दरवाज्यावर गणेशपट्टी आणि तोरणाची नक्षी कोरलेली असते . अंतराळाजवळ नंदी मूर्ती असते . हेमाडपंथी मंदिर बांधणीत प्रवेशमंडप , सभामंडप , अंतराळ व गर्भगृह अशी रचना असते . मंदिराच्या बाहेरच्या बाजूला पायव्यापासूनच कणीची नक्षी असते जी सरळ आमलकापर्यंत जाते . शिखराच्या छोट्या छोट्या प्रतिकृती खालपासून कळसापर्यंत जातात आणि ह्या शिखरांपासूनच वरती निमुळते होत जाणारे मुख्य शिखर बनते . आमलकावर कळस असतो . 

२. मंदिर रचना : * मन्नाथेश्वर मंदिराचा सभामंडप १६ स्तंभी असून लांबी सुमारे २५ फुट , अंतराळ ८ फुट आणि सभामंडपाच्या पातळीपासून ३ फुट खाली १० x १० फुटाचा गाभारा आहे . मन्नाथेश्वर मंदिर पूर्वाभिमुख आहे . 
* गर्भगृहात सयोनिज शिवलिंग असून वेदीचा आकार चौकोनी आहे . वेदीचे मुख उत्तर दिशेला आहे . शिवलिंगाची पूजा दक्षिणेकडे बसून व उत्तर दिशेला तोंड करून केली पाहिजे , अशी मान्यता आहे . 
* मंदिराच्या भिंतींना बाहेरून पायथ्यापासून त्रिकोणी आकाराच्या भिंती बांधून आधार दिलेला आहे . हा आधार मंदिर बांधल्यानंतर बऱ्याच वर्षांनी दिलेला असावा . मंदिराचे शिखर बनलेच नाही किंवा कालौघात पडझड झाली असावी . सांप्रत गर्भगृह व अंतराळावर आधुनिक बांधकामांचे शिखर आहे . 

३. पूजा अर्चना व उत्सव : * राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मन्नाथगडावर कार्यक्रम झालेले आहे . त्यांचे छोटेखानी देऊळ पण येथे आहे . राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त येथे आताही दरवर्षी कार्यक्रम होतात . 
* आधी येथे पकडगिरी महाराज सेवा करायचे . नंतर आपले जिवितकार्य संपेपर्यंत रामदास महाराज यांनी सेवा केली . रामदास महाराज लहाणपणापासूनच बुलढाण्याकडून येथे आले होते . त्यांनी ऋषीदरा येथे ११ वर्षे तपश्चर्या केली होती . येथील नवीन देऊळ व बाकी बांधकाम , विकास त्यांच्याच कारकीर्दीत झाले . येथेच त्यांची समाधी आहे . 
* प्रत्येक सोमवारी मन्नाथेश्वर शिवशंभूची मोठ्या श्रद्धेने आरती व पूजा अर्चना होते . 
* महाशिवरात्रीला मन्नाथगडावर परिसरातील सर्वात मोठी यात्रा भरते . 
* मन्नाथेश्वर मंदिर आणि उत्सव कमेटीच्या नियोजनाने येथे वर्षभर कार्यक्रम होत असतात .
* नवसाला पावणारा मन्नाथेश्वर शिवशंकर आणि मन्नाथबाबा ह्यांची मोठी महिमा आहे . 
* रामायण काळातील हे प्राचिन तीर्थक्षेत्र देशभरात विख्यात आहे . 
जय मन्नाथेश्वर शिवशंकर...
जय मन्नाथबाबा की...

( सहयोग : मनोज भाऊ गोरे , वसंतराव चापले )
लेखक : इंजि . सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

No comments:

Post a Comment