Wednesday, August 5, 2020

सरवा - भाग १७

सरवा - भाग १७

सद्यानं बयलं सोडले. तीघं यी झन बयलाच्या मांगं मांगं चालाले लागले .बयलं सडकीनं निंगाले ; मंग पांदनीत पलटले .
' बयलायच्यानं लय फेरा पडला बावा....' वस्यानं पांदनीतून चालता चालता मनलं.
' हव नं , आपनच असतो त् येकपावल्यानं आता पावतर जांभराच्या पारीवर यी पोचलो असतो .' सद्यानं हातातल्या काडीनं रानतुरसीले झोडपत मनलं .
' थे त् हायेच .' परभ्यानं चाकोलीच्या काठानं चालत मनलं.
बड्डाच्या खाली उतरले तसी पांदनीत फसन चालू झाली . सारा काऱ्या मातीचा चिख्खल . चाकोलीच्या काठानं रानतुरसी , चिलाटी , परसाच्या फानट्या लोंबल्या व्हत्या . बयलं चाकोलीतूनच चालले व्हते . त्यायचे पाय घोट्यापावतर फसत व्हते . परभ्यानं चप्पल काहाडून हातात घेतली आन् चाकोलीच्या मधातल्या उचाटावरून चालाले लागला . वरची वारली माती काट्यावानी रुतत व्हती . थे नाल्याजवर पोचले . 
' कितीक पानी असन रे ? ' वस्यानं सद्याले पुसलं .
' मंधात कमरी येवढं त् असनच .' सद्यानं अंदाज घेत मनलं .
बयलं पान्यातून निंगाले .
' माह्या मांगं या .... भेवू नका .' सद्यानं पुढं होत मनलं .
सद्यानं परभ्याचा हात पकडला आन् परभ्यानं वस्याचा हात पकडला . सद्यानं झोरा खांद्यावर अटकवला आन् झोका झोकानं पान्यातून निंगाला . वस्याचा पाय गोल गोट्यावरून घसरला आन् थो पान्यातच पसरला . सद्यानं परभ्याचा हात सोडला आन् वस्याचा दुसरा हात पकडला . दोघायनं वोढून वस्याले पान्या बाहिर काढलं . वस्या पुरा वोला झालता . 
' कसा बे तू ? ' सद्यानं वस्याले मनलं .
' का कसा बे... ज्यानून पडलो का मी .' वस्यानं चिडून मनलं .
' ठिक हाये... चिडू नको बा .' सद्यानं समजावत मनलं.
' चिडू नाय त् का .... येक त् पुरा वला झालो आन् तू मलेच मनून रायला .' वस्यानं स्यरटं पिरत मनलं .
' ठिक हाये... ठिक हाये..भांडू नका. ‌ कोनी ज्यानून बूजून थोडाच पडते. चाला , बयलं लय पुढं गेले.' परभ्यानं दोघायले समजावत मनलं ‌.
सद्या धावत धावत बयलामांगं गेला .
' पाह्य कसा पराला थो .' वस्यान परभ्याले मनलं .
' जाऊ दे त्याले . मी हावो नं तुह्यासंगं ? .' परभ्यानं मनलं .
वस्या ठाठरुन गेलता . तीघं यी पारीवर पोचले . पानी भूरभूर चालू झाला . बयलाच्या केसावर पान्याचे बारीक बारीक ठेंबं जमा झालते .बयलानं आंग झटकलं तसे थे पान्याचे मोती फवाऱ्यासरखे उडले . दोनी गडी मोठ्या जोडीनं डवरुन रायले व्हते . लहान बयीलजोडी चराले लागली . त्याच्यातल्या लाल्यानं धुऱ्याच्या धडीत सिंग खुपसला . गवता सगट माती सिंगानं उखरली आन् डखराले लागला . 
' कायले आले गा ? ' मोठ्या गड्यानं डवरे थांबवत तीघायकडे पाहात इचारलं .
' जांभरं तोडाले .' सद्यानं डवऱ्याकडं जात सांगतलं .
' आता कुठं रायले जांभरं .... पाहून घ्या थोडेबूत असन तं .' गड्यानं मनलं .
परभ्या डवऱ्याजवर पोचला . गड्याले बिसकुटचा पुडा देल्ला .
' तुमी खा न् बापू ..... स्यिदोरी हाये आमची .' गड्यानं मनलं .
' राहू द्या . माह्या जवर अजून हाये .' परभ्यानं मनलं .
' थ्या वरच्या आवडाच्या धुऱ्यावर निंबीजवर जा . तिथं काटेलं लागले हाये . तोडून घेजा .' गड्यानं सांगतलं .
' ठिक हाये .' परभ्यानं गड्याजवरची पान्याची बाटल घेत मनलं .
' बापू , झाडावर नको येंगजो ; आन् इचूकाट्याचं बराबर पाहून जाजा .' मोठ्या गड्यानं समजावलं .
' हव , ठिक हाये . ' परभ्यानं मनलं .
परभ्या मोठ्या जोडीजवर गेला . त्यायच्या आंगावर मास्या बसून रायल्या व्हत्या . परभ्या दोनी बयलाच्या मंधात उभा राहून त्यायले खाजवाले लागला . उलिसा यी खाजवाचं थांबला त् दोनी बयलं त्याले डोकस्यानं ढुस्या मारे .मोठा गडी बिडी प्याले लागला .
' चालनं गा बापू , इरभर खाजवसीन का ? ' सद्यानं परभ्याले मनलं .
' हव , चाल .' परभ्यानं बयलाचा लाड करत मनलं . 
परभ्या बयलाचा लाड करे त् बयलं गऱ्यातून घोगरा आवाज काढे .
तीघं यी जांभराच्या झाडाजवर आले . पान्याची भूरभूर थांबली व्हती . खालतं पडले थे जांभरं सद्सदून गेलते .वस्या त्याच्यातले कायी येचाले लागला . 
' कायी चांगले हाये .' वस्यानं येचता येचता मनलं .
' झाडाले त् दिसून नायी रायले .' परभ्यानं वरतं पाहात मनलं .
' तू थांब , मी आनतो बराबर .' सद्यानं चपला काहाडत मनलं .
' बराबर चेंगसीन रे बावा ... नायी त् करसीन उपाध .' परभ्यानं मनलं .
' तू पाह्यं त् आता ....' सद्यानं सरसर झाडावर चेंगत मनलं .
पानायच्या मांगं रायल्या सुयल्या जांभराले हुडकत सद्यानं खाली टाकाले सुरवात केली .
' थांब रे बावा .... खाली नको टाकू . आमी दुपट्टा धरतो , त्याच्यात टाक . ' वस्यानं गऱ्यातला दुपट्टा काढत मनलं .
परभ्या आन् वस्यानं दुपट्ट्यात जांभरं झेलले . काही काही दुपट्ट्यावरून टन् कन् उडी मारून खाली पडे . परभ्यानं झोऱ्यातले बिसकुट पुडे येका दगडावर ठिवले आन् दुपट्ट्यातले जांभरं त्याच्यात भरले .
' झोरा भरला कारे ऽ ?' सद्यानं झाडावरून आवाज देल्ला .
' नायी , भरला त् नायी ब्वाॅ .' वस्यानं खालतून सांगतलं .
' आता दिसून नायी रायले रेऽ .' सद्या वरतून बोंबलला .
' राहू दे . उतर खाली .' परभ्यानं मनलं .
सद्या खाली उतरला ... येकदम वलाचिप !
' त्हान लागली बावा....' सद्यानं जोरात सास सोडत मनलं .
' चाल , डवऱ्याजवर जाऊ .' परभ्यानं मनलं .
तीघं यी डवऱ्याजवर आले . गड्याच्या बाटल मंधून पानी पेलं . लहान जोडीच्या घोल्लराचा आवाज येत व्हता पन् थे दिसून नायी रायले व्हते .
' वस्या लायनी जोडी घिवून येतं का ? ' सद्यानं पुसलं .
' तू काऊन नायी जात त् ? ' वस्यानं नाराजीनं मनलं .
' मी तवर काटेलं तोडतो . दे झोरा माह्याकडं .' सद्यानं वस्याजवरचा झोरा घेत मनलं .
सद्या न् परभ्या वरच्या आवडाकडं निंगाले . अचानक येका झुडपातून लय पाखरं ' झुर्रर्र ऽऽ ...' आवाज करत उडले . परभ्या त् भेबारुन गेला .
' बाटरं व्हय थे . भेवतं का गा बापू ? ' सद्यानं परभ्याच्या खांद्यावर हात ठिवत मनलं .
' भेवलो नायी पन् दचकलो खरच .' परभ्यानं मनलं .
दोघं धुऱ्यावर आले . निंबीच्या झाडाच्या बाजूनं काटेलाचा येल सद्याले दिसला . त्यानं झोरा परभ्याजवर देल्ला . धुऱ्यावरच्या परसाची येक बारीक खांदी तोडली . 
' तू तिथच थांब ... मी पाह्यतो काटेलं .' सद्यानं परभ्याले मनलं .
सद्यानं काडीच्या साह्यऱ्यानं येल इकडे तिकडे केला , आन् काटेलं तोडाले लागला . 
' माह्याकडं फेकसीन .' परभ्यानं मनलं .
' खिसे भरले मनजे फेकतोच बावा तुह्याकडं .' सद्यानं मनलं .
सद्याचे खिसे भरले तसे त्यानं काटेलं फेकाले सुरवात केली . परभ्या येचाले लागला .
' पिवरे नको तोडू .' परभ्यानं पिवरे काटेलं पाहून मनलं .
' थे आपरंगच तुटले . तू पिवरे धुऱ्यातच फेकून दे .' सद्यानं मनलं .
' झोरा भरला रे ....' परभ्यानं सांगतलं .
' तू जमा कर फक्त , मी सागाच्या पानाचा पुडका बनविन , त्याच्यात भरु .' सद्यानं मनलं .
परभ्या पिवरे काटेलं धुऱ्यात फेकाले लागला तसा ' फुस्स ऽ ' आवाज आला .
' सद्या ऽ .... कायचा तरी आवाज आला . तू आंदी इकडे ये .' परभ्या चिल्लावला .
सद्या काडी घिवून आला .
' कुनीकडून आवाज आला ? ' सद्यानं पुसलं .
परभ्यानं जिकडे काटेलं फेकले व्हते तिकडे बोट दाखवलं .
' कोन हय रेऽ ... मेरे सोबती को भेवाडता हय..' सद्यानं तिकडे जात मनलं .
काडी पुढं धरून थो झोक्कानं पाहात व्हता .... थो येकदम थांबला .
' ये तो कवड्या सरप हय रे बावा ऽ .... गुंडारी मार के बयठा हय ..' सद्यानं सरपाकडं पाहात मनलं .
' दिसला का रे ? ' परभ्यानं इचारलं .
' हव.... त्याले जाऊ दे .. मी पुडका बनवतो आंदी .' सद्यानं मनलं .
वस्या बयील जोडी घिवून आला . तीघं यी बांधोडीवर आले . बयलायले पानी पाजून बांधलं न् हिरीवर आले ‌. सद्यानं पानी काढलं . तीघानं यी पानी पेलं . परभ्यानं खिस्यातले बिसकुटचे पुडे काहाडले .
' चाला बावा घरी .' वस्यानं बिसकुट खाऊन पानी पेता पेता मनलं .
' जावाचच हाये.. इथं कायी आपला मुक्काम नायी .' सद्यानं चिडवलं .
तीघं यी घरी आले . परभ्याच्या मायनं जांभरं आन् काटेलाचे तीन हिस्से केले आन् सद्या न् वस्याले देल्ले .
' येतो रे बापू .... आपली जिक्कन आपल्यातच आ ...' सद्यानं परभ्याले डोरे मिचकावत मनलं .
दोघं यी गालातच हासले .
' कायची जिक्कन रे ? ' वस्यानं पुसलं.
' कायी नायी ... चाल ...' सद्यानं दिंडी दरुज्यातून पाय टाकत मनलं ...    ( क्रमशः ) 

लेखक : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर .

No comments:

Post a Comment