Saturday, November 12, 2022

आवर्त ( मराठी कविता ). Marathi language _ मराठी भाषा

आवर्त
Marathi language _ मराठी भाषा

झळाळते मृगजळ
झाकोळते भोळे डोळे
चित्त पंकमय तळे
कसा यशस्वी मी पार्थ ?

गुंफून हावरा कोळी
काळे पातकाचे जाळे
आत स्वतः तळमळे
कसा सफळ मी सार्थ ?

नात्या - नात्यांमध्ये जाळ
सत्य - असत्य हे खुळे
रक्त एकच साकळे
कसा मनी धारातीर्थ ?

अपुरे हे गंगाजळ
अधांतरी दीप जळे
चहुबाजू ढग काळे
कसा पावन मी तीर्थ ?

झाले स्वप्नांचे आभाळ
छळे सौदामिनी जाळे
मार्ग दिशांना ना कळे
कसा भेदू मी आवर्त ?

रचना : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर

No comments:

Post a Comment