सरवा - २५
Varhadi dialect _ वऱ्हाडी बोली
परभ्याचा अभ्यास चालू व्हता . ६-६ मह्यन्यानं पेपर राहात व्हते . बदलापूरच्या सुनील संगं त्याची चांगलीच दोस्ती झालती . दोघंयी संगमंगंच राह्ये . हप्त्यातून येकडाव तरी परभ्या आन् मंदारचं बोलनं व्हये . सुनील आन् परभ्यानं इंजिनियरिंग म्याथेम्याटिकची सुरवातीपासूनच टिवस्यन लावली व्हती . दाआजीनं ल्यापटाप घिवून देल्ता . सुनीलजवर मातर पह्यल्यापासूनच ल्यापटाप व्हता . सोलापूरचा पोरगा कायी जास्त यायच्यात मिसरत नोता . थो येकला येकलाच राह्ये . परभ्याच्या गुरुपमंदी अवरंगाबादच्याच दोन पोरी बी व्हत्या . कनकचे दाआजी रेलवेत इंजिनियर व्हते त निधीचे दाआजी आन् माय झेडपीत मास्तर व्हते . येक दिवस सुनीलचा ल्यापटाप इचकला . परभ्या अन् सुनील ल्यापटाप दुरुस्त कराले दुकानात गेले . दुरुस्त करनाऱ्यानं ल्यापटाप दोन दिवस दुकानातच ठिवा लागन , असं सांगतलं . करन काय जवा वरतं झाले पाय ! दुसरा कायी उपाव बी नोता . दोन दिवस सुनीलनं परभ्याचा ल्यापटाप वापरला आन् त्याच्या जवरच्या हार्ड डिस्क मंदी सारं सेव्ह करून ठिवलं . परभ्या अन् सुनीलचं कालेजमंदी चांगलं नाव व्हतं . थे रात रातभर अभ्यास करे .
परभ्यानं मायले विडिवो काल लावला .
' बोल बापू.... जेवन झालं न ? ' मायनं अनमन्या भावानं इचारलं .
' हव , जेवलो आताच अन् फोन केला . तू लय उदास दिसून रायली माय ..' परभ्यानं मायचा चेहरा पाहून मनलं .
मायचे डोरे लाल लाल आन् सुजल्यासरखे बी दिसत व्हते .
' का झालं माय ?' परभ्यानं कारजीनं इचारलं .
' का सांगू बापू.... आपल्या पांढऱ्या बयलाले वाघानं मारलं रे....' मायनं रडत रडत सांगतलं .
' असं कसं झालं ! येवढा गबर बयील मारला त्यानं .... दाआजी कुठं हाय ?' परभ्यानं इचारलं .
मायनं दाआजीकडं मोबाइल देल्ला . सपरीत लोकं , गडीमानसं , सद्या न वस्या बी बसले व्हते . मांगं ह्याच पांढरा बयील परडला व्हता , पन त्याच्या ताकतीपुढं परडचं जह्यर बी हारलं व्हतं . अन् आता वाघानं त्याचा जीव घेतला मंजे कमालच झाली .
' असा कसा मारला दाआजी आपला बयील वाघानं ?' परभ्यानं इचारलं .
' वाही चालू व्हती . मोठी जोडी नदीआंगच्या वावरात आन् लाह्यनी जोडी मांडवाच्या वावरात व्हती . भाकर खावासाठी मोठ्या गड्याले मांडवात जाचं व्हतं . त्यानं आऊत सोडला , नदीवर बयलं पानी पाजले आन् मोहाखालच्या बांधोडीवर जोडी बांधून , कडबा टाकून मांडवात आला . दोनी गड्यायनं भाकर खाल्ली आन् गोस्टीमाता करत बसले . त्यायले नदीकडून बयलाचा हंबराचा आन् वाघाचा बी आवाज आला . दोघं बी तुताऱ्या घिवून तिकडं धावले . सिवारातले लोकं बी काड्या घिवून नदीकडंच धावत व्हते . जसी वाघानं पांढऱ्या बयलाची नड्डी पकडली तसं लाल्यानं खुटा उफडला आन् वाघावर धावला . पर तवर वाघानं पांढऱ्या बयलाची नड्डी फोडली व्हती ... सारीकडं रगतच रगत ! लाल्या बयील आन् लोकायले पाहून वाघ नदी नदीनं परून गेला....' सांगता सांगता दाआजीचे डोरे वले झाले .
दोनी जोड्या घरच्याच गवराऊ गायीच्या व्हत्या . थे गोऱ्हे व्हते तवापासून परभ्यानं त्यायले पाह्यलं व्हतं . पांढऱ्या आन् लाल बयलाची मोठी जोडी हत्त्यावानी व्हती . गावा - सिवारातले सांडे बी त्यायच्या वाटी नायी जाये . पुऱ्या गावात ह्या बयीलजोडीचं नाव व्हतं . कोनाच्या बंड्या फसल्या त हेच जोडी थ्या बंड्या काहाडून दे . ताकतीले आरकाट असले तरी सोभावानं देवासरखे समझदार व्हते थे ! परभ्या दिसला त पांढरा बयील चरेच नायी . त्याले खाजवलं पायजे मून थो इरभर परभ्याच्या मांगं लागे . परभ्याच्या खूबच लाडाची हे बयीलजोडी लाखमोलाची व्हती . हरेक वावराचे , काटोल - कारंज्याचे रस्ते त त्यायले पाठ व्हते . त्यायचा ना कासरा वढा लागे ना त्यायले दपटा लागे . थे तिफनीचे आन् काकरीचे तासं त असे पाडे क जसं कागदावर इस्केलपट्टीनं रेघा फाडल्या मनन ! मानसायपरस यी समझदार जोडी व्हती थे !!
परभ्याचे डोरे बी गराले लागले . कवा गावाले जातो न कवा नायी , असं त्याले झालं .
' काय झाले प्रभाकर ?' परभ्याले रडतानी पाहून सुनीलनं इचारलं .
परभ्यानं पुरी रामकथा सांगतली .
' दाआजी मी येऊ का गावाले ?' परभ्यानं दुनन फोन करून इचारलं .
' कायले कालेज न अभ्यास बुडवतं बापू ... जे झालं थे झालं... हे करमाचे भोग रायते . फारेस्टमंदी रिपोट केली व्हती . पंचनामा झाला हाये . पंचनामा झाल्यावर बयलाची सदगत केली . आमी आताच वावरातून आलो . मांडवातले ढोरं यी घरीच आनले हाये . ' दाआजीनं सांगतलं .
परभ्याले आज कायी झोप लागली नायी . रातभर ह्या कडाचा थ्या कडावर व्हत रायला . पाह्यटी कवा डोरा लागला थे परभ्याले समजलंच नोतं .
परभ्या वरगात यी चुपचापच व्हता . दुपारी सारे पोरं क्यांटीनमंदी गेले पन परभ्या वरगातच बसून रायला . निधीले यी परभ्यासाठी खराब वाटून रायलं व्हतं . तिले सुनीलनं थोडं बूत सांगतलं व्हतं . परभ्या ल्यापटाप उघडून बसला व्हता . अचानक त्याच्या खांद्यावर कोनीतरी हात ठिवला . परभ्यानं दचकून मांगं पाह्यलं .
' काय झाले ?' निधीनं त्याच्याजवर बसत इचारलं .
परभ्यानं बयलाची गोस्टं सांगतली .
' तू सकाळी पण जेवला नाही , असे सुनीलने सांगितले . काय हे ! ' निधीनं आपला डब्बा टेबलावर उघडत मनलं .
' घे , काहीतरी जेऊन घे ...' निधीनं त्याचा ल्यापटाप बंद करून डबा त्याच्यापुढं करत मनलं .
' भूक नाही निधी ..' परभ्यानं खालच्या मानीनं मनलं .
निधीनं त्याले जबरदस्तीनं जेवाले लावलं . परभ्यानं दोन चार घास खाल्ले . सुनीलनं त्याच्यासाठी फ्रूटी आनली . निधीनं डबा ब्यागमंदी ठिवला . कलासची घंटी वाजली .
कालेज सुटल्यावर निधी न कनक परभ्याजवर आले . सुनील परभ्याजवरच उभा व्हता .
' रात्री तुझ्यासोबत प्रभाकरला जेवायला लावशील . आणि हो , प्रभाकर जेवणाकडे अजिबात दुर्लक्ष करायचे नाही . उद्या मी सुनीलकडून तुझी माहिती घेणार आहे कळलं .. चला येते मी .' निधीनं कनकसंगं जात मनलं .
सुनील गालातल्या गालात हासत व्हता .
' आता तुला काय झाले ?' परभ्यानं सुनीलले इचारलं .
' काही नाही.. असंच , चल .' सुनीलनं परभ्याच्या खांद्यावर हात ठेवत मनलं . ( क्रमशः )
लेखक : सुरेश महादेवराव देशमुख , नागपूर
साजरी रचना भाई साहब जी
ReplyDelete